घरमुंबईसोन्याची पावडर सांगून २५ लाखांना विकली माती

सोन्याची पावडर सांगून २५ लाखांना विकली माती

Subscribe

मित्राने मित्राला घातला गंडा

सहा महिन्यात झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन मित्रालाच 25 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार वाशीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाशी सेक्टर 29 मध्ये राहणार्‍या तुषार शेठ असे यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची विशाल चौधरी नामक व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून विशाल चौधरी याने त्यांच्या हरियाणा येथील गावात शेजारी राहणार्‍या बाईकडे पाच ते दहा किलोपर्यंत सोन्याची पावडर असून, या महिलेला पैशांची गरज असल्याने ती सोन्याची पावडर स्वस्तात विकत असल्याचे शेठ यांना सांगितले होते. ही सोन्याची पावडर वितळवल्यानंतर त्याचे सोने तयार होत असून, बाजारात 80 लाख रुपये किंमत असलेली सोन्याची पावडर 50 लाखांमध्ये मिळणार असल्याचे सांगितल्याने शेठ यांनी ही पावडर विकत घेण्याची तयारी दर्शविली.

मात्र शेठ यांनी त्यांच्याजवळ केवळ 25 लाख रुपये असल्याचे सांगितल्यानंतर विशालने स्वत:कडचे 25 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून दोघे मिळून सोन्याची पावडर विकत घेण्याचे ठरवले. त्यानंतर आठवड्यात विशाल हा सोन्याची पावडर घेऊन खुडरु नावाच्या व्यक्तीसोबत शेठ यांच्या कोपरखैरणे येथील कार्यालयात गेला होता. यावेळी खुडरू नावाच्या व्यक्तीने काळ्या रंगाची सोनेमिश्रीत पावडर शेठ यांना दाखविल्यानंतर शेठ यांनी थोडे सोनेमिश्रीत पावडरची सोनाराकडून खात्री करून घेतली असता, ते खरे सोने असल्याचे आढळून आले. त्यानंतर शेठ यांनी विशालला 25 लाख रुपये रोख दिल्यानंतर विशालने खुडरुकडे असलेली पावडरची बॅग शेठ यांना देऊन खुडरुला कल्याण येथे सोडून येण्याच्या बहाण्याने पलायन केले. त्यानंतर काही वेळाने शेठ यांनी त्यांना देण्यात आलेल्या सोन्याच्या पावडरची सोनाराकडे नेऊन तपासली असता, ती माती असल्याचे कळले. त्यानंतर भामट्या विशाल चौधरीने फसवणूक केल्याचे शेठ यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -