घरमुंबईमंत्रालय कॅन्टिन वेटर पदाच्या परीक्षेत वशिलेबाजी

मंत्रालय कॅन्टिन वेटर पदाच्या परीक्षेत वशिलेबाजी

Subscribe

परीक्षेचाही उडाला बोजवरा

मुंबई:मंत्रालयाच्या कॅन्टिन वेटर पदासाठीच्या परीक्षतेत व एकूण पदभरतीत वशिलेबाजी आणि त्यासोबत ‘अर्थ’कारण यांचा शिरकाव झाला, अशा तक्रारी लागल्या आहेत. या पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे पेपर दोन वेळा फुटले. या परीक्षा केंद्रांचा संपूर्ण ताबा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी घेतला होता, अशा प्रकारे या परीक्षेचा बोजवरा उघडाला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मंत्रालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसह मंत्री आणि सचिव यांचा नास्ता, जेवणाची व्यवस्था मंत्रालयातील तीन स्वतंत्र कॅन्टिनमधून केली जाते. या कॅन्टिनमध्ये काम करण्यासाठी मे महिन्यात वेटर पदाची जाहिरात देण्यात आली होती. या पदभरतीची माहिती मिळताच सुमारे अडीच हजार इतक्या संख्येने उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला. यासाठीची पहिली परीक्षा ३ जून २०१८ रोजी घेण्यात आली होती. दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी या शाळेत परीक्षा केंद्र ठरवण्यात आले होते. या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून वा पर्यवेक्षक म्हणून शासनाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी कुठे बसावे, याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती आणि पेपर कसा सोडवावा, याविषयी ते पुरते अंधारात होते. पर्यवेक्षकच नसल्याने शाळेतील विद्यार्थीच पर्यवेक्षकाचे काम करत होते. शाळेतील आयटी लॅबमधील अमित चिपकर या परीक्षेचे नियंत्रण करत होते. हा नियंत्रक उमेदवारांशी उर्मटपणे वागत होता, अशा तक्रारी करण्यात आल्या. विशेष म्हणजे जे पेपर आणण्यात आले होते ते उघड्या पाकिटात होते.

- Advertisement -

याबाबत परीक्षार्थी उमेदवारांनी तक्रारी केल्या. पण त्याची दखल कोणी घेतली नाही. यामुळे याची तक्रार आपले सरकार पोर्टलच्या तक्रार निवारण कक्षात करण्यात आली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. पुढे ही परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले. पुन्हा २९ जुलै २०१८ रोजी याच केंद्रावर दुसर्‍यांदा परीक्षा घेण्यात आली. तेव्हाही केंद्राची स्थिती तशीच होती. ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड मागितले जात होते. परीक्षेस उपस्थित होते त्यातल्या अनेकांची हजेेरीही घेण्यात आली नसल्याची बाब पुढे आली. महाऑनलाईन परीक्षेत प्रश्नपत्रिका उघड्या कशा, असा सवाल परीक्षार्थी विचारत होते. फोनवर तक्रार करण्याचा प्रयत्न करता तिथे कोणीही उत्तर देत नसल्याच्या तक्रारी काहींनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

अत्यंत वाईट अनुभव

कॅन्टिनच्या वेटर पदासाठीच्या परीक्षेत संपूर्ण सावळागोंधळ होता.आम्ही खूप लांबून परीक्षा देण्यासाठी आलो होतो. पण परीक्षेची अवस्था पाहाता आपली फसगत झाली, याची खात्री पटली. परीक्षा घेण्याचा घाट घालण्यात आला पण परीक्षेचे काय झाले हे कोणीही सांगू शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे.
– सागर सातवेकर(परीक्षार्थी उमेदवार), सुळे, ता. आजरा, जि. कोल्हापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -