घरमुंबईनवी मुंबईत चेनस्नॅचिंग टोळी कार्यरत

नवी मुंबईत चेनस्नॅचिंग टोळी कार्यरत

Subscribe

चार दिवसांत आठ महिलांच्या अंगावरील लाखोंचे दागिने लुटले

नवी मुंबई : गर्दीचा फायदा घेऊन मुंबईच्या लालबागमध्ये लुटमार करणार्‍या परप्रांतिय टोळ्या कार्यरत असताना त्यातील काही टोळ्यांनी आपला मोर्चा नवी मुंबईत वळवला आहे. गणेशोत्सवादरम्यान, नटून थटून पुजेला निघालेल्या महिलांना या टोळ्या लक्ष्य करत आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये आठ महिलांच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने या टोळीने लुटले आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात नवी मुंबईतील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून नियमित पेट्रोलिंग आणि तपासणी सुरू आहे. तरीही चोरट्यांनी सलग चार दिवसांमध्ये आठ महिलांच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने लुटून पोलिसांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

सण-उत्सवादरम्यान महिला मोठ्या प्रमाणात दागिने घालून फिरतात. त्याचा फायदा परप्रांतिय लुटारुंनी घेतला आहे. विशेष म्हणजे लुटारूंनी रात्रीच्या सुमारास एकट्यादुकट्या महिलांना गाठून दागिने लुटण्यास केली आहे. १० सप्टेंबर रोजी दुपारी नेरूळ सेक्टर १९ मधील फ्रेंड्स सोसायटीत घुसून पहिल्या मजल्यावरील साधना दाते यांच्या अंगावरील ३५ हजाराची सोन्याची चेन चोरट्यांनी लुटली.

त्याच दिवशी आयसीएल कॉलेजजवळ रात्री ८ च्या सुमारास बस स्टॉपवर वाट पाहत उभ्या असलेल्या मनुसिंग सूर्यनाराण सिंग (५३) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून चोरट्यांनी दुचाकीवरून पलायन केले.

- Advertisement -

त्यानंतर सायं. ७ च्या सुमारास पनवेल येथे घडलेल्या तिसर्‍या घटनेत मुलीसह वॉकिंगसाठी जाणार्‍या शोभा मगर या महिलेची सोन्याची चेन चोरून दोघा लुटारुंनी पोबारा केला. ११ सप्टेंबर रोजी सायं. ७.१५ वा. सीवूड्स सेक्टर ४० येथील रंजना पाठक यांच्या अंगावरील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचली.

या घटनेपाठोपाठ नेरूळ सेक्टर- ८ येथे राहणार्‍या सुरेखा भोईटे या रात्री ७.४५ च्या सुमारास देवदर्शन करून परतत असताना लुटारुंनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून सहकार्‍यासह दुचाकीवरून पलायन केले. या दोन्ही घटना अवघ्या अर्ध्या तासात घडल्या. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी कामोठे सेक्टर- ६ मध्ये दुपारी ४.३० च्या सुमारास सीमा पवार मैत्रिणीसह पायी चालत घराच्या दिशेने जात होत्या. तेव्हा दुचाकीवरील लुटारूने गळ्यातील ६० हजाराची सोन्याची चेन लुटली.

या घटनेपाठोपाठ लुटारूंनी १३ सप्टेंबर रोजी सीबीडी सेक्टर- ३ येथील साई अपार्टमेंटमधील अश्विनी गायकवाड हिच्या गळ्यातील ३५ हजाराचे दागिने रात्री ७.३० च्या सुमारास लुटून दोघा लुटारूंनी पलायन केले. या घटनेनंतर चेन स्नेचिंग करणार्‍या लुटारूंनी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणपतीचे दर्शन घेऊन सासूसह घरी परतणार्‍या नवविवाहिता रेणुका आशिष म्हात्रे गळ्यातील तब्बल १६ तोळे वजनाचे तीन लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने भरदिवसा लुटून नेले.

चेन स्नेचिंग करणार्‍या लुटारूंनी चार दिवसांमध्ये आठ महिलांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे दागिने लुटून नेल्याने महिला वर्गात या लुटारूंची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.यावर पोलिसांनी कठोर पावले उचलायला हवीत अशी मागणी महिलांकडून होत आहे.

गणेशोत्सव दरम्यान शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याचवेळी पोलिसांची चोरट्यांवरही नजर आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी ट्रॅप लावले आहेत. साध्या वेशातही पोलीस चोरट्यांवर नजर ठेवून आहेत.29 गुन्हेगारांना आतापर्यंत हद्दपार करण्यात आले आहे. यापुढे शहरातील दागिने चोरट्यांसह इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या तब्बल 510 गुन्हेगारांची यादी तयार आहे. ते राहत असलेल्या ठिकाणाचीही माहिती घेण्यात येत असून गणेशोत्सवानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारणार आहोत. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरात गुन्हेगारी कमी झालेली दिसून येईल. -सुधाकर पठारे, उपायुक्त, परिमंडळ 1,नवी मुंबई पोलीस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -