घरताज्या घडामोडीखड्ड्यांविरोधात जनतेचा आवाज दाबता येत नसतो, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

खड्ड्यांविरोधात जनतेचा आवाज दाबता येत नसतो, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

Subscribe

मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल

मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या दळणवळणामध्ये अनेक समस्या येत आहेत. खड्ड्यांविरोधात आवाज उठवणाऱ्याचा आवाज दाबण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते परंतु कितीही प्रयत्न केले तरी आवाज दाबता येणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. खड्ड्यांच्या प्रश्नांवरुन चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. गेल्या २४ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेने खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण २१ हजार कोटी खर्च केले परंतु दरवर्षी लोकांचे हालच होत आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून निधीला खड्ड्यात पाडण्याचे काम सुरु असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. मुंबईतील खड्ड्यांवरुन महानगरपालिकेला प्रश्न केले आहेत. तसेच कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी दाबता येणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात उठणारा आवाज दाबण्याचे प्रयत्न कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं आहे की, गेल्या २४ वर्षांत मुंबई महानगरपालिकेने रस्ते आणि खड्डे यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २१ हजार कोटी खर्च केले आहेत आणि तरीही प्रवाशांचे दरवर्षी तेच हाल होत आहेत. कारण महानगरपालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने जनतेच्या करातून आलेल्या निधीला खड्डा पाडण्याचे काम सुरु आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्यामुळेच मुंबई महानगरपालिका जरी तब्बल ४२,००० खड्डे भरल्याचा दावा करत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र हे खड्डे भरलेच गेले नाहीत किंवा झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. हिंदमाता पुलावरील खड्डे एका दिवसात जैसे थे होतात, यातून हेच स्पष्ट होते.

अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना

डांबरीकरणानंतर केवळ १२ तासांत पुन्हा खड्डे पडले तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे. दोन्हीही महानगरपालिका प्रशासनाकडून अनेकदा झालेल्या अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना हा कर्तव्य चोख बजावत असल्याचा आव आणून आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार झाला आहे. मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Marathwada Heavy rain : पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा रद्द


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -