घरमुंबईशिवसेनेचे मतदार संघ मुख्यमंत्री ठरवणार!

शिवसेनेचे मतदार संघ मुख्यमंत्री ठरवणार!

Subscribe

उद्धव ठाकरे यांच्या विधानाने खळबळ

यंदाच्या विधान सभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे मतदार संघ भाजप ठरवणार आहेत. वाचून आश्चर्य वाटत असेल तरीही हे सत्य आहे. तसे खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ‘मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, तुम्हीच कोणते ते मतदार संघ ठरवा आणि मला यादी द्या. मी ती यादी शिवसैनिकांसमोर ठेवीन,’ असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेना-भाजपत खरंच सर्व आलबेल आहे का, असा संभ्रम पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव तब्बल १५ वर्षांनी शुक्रवारी शिवसेनेत परतले.‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्या हातावर शिवबंधन बांधले. यावेळी सेना-भाजप युतीबाबत उद्धव यांना प्रश्न विचारले. भाजपसोबत युतीची बोलणी कुठवर आलीय, युती होणार की नाही, शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले.

- Advertisement -

त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यावेळी शिवसेनेची यादी तुम्हीच तयार करा, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यांनी एकदा यादी बनवली की मी ती शिवसैनिकांपुढे ठेवेन’, असे उद्धव ठाकरे म्हणताच, पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होणार का? आणि युती झाली तर शिवसेना कोणत्या जागा आणि किती जागा लढणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असताना आता खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नवीन मार्ग काढला आहे. सध्या सुरू असलेल्या उलट सुलट चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक टोला लगावला आहे.

शिवसेनेची यादी मुख्यमंत्री तयार करत आहेत, असे उद्धव ठाकरे कोणत्या हेतूने म्हणाले हे त्यांनाच माहित. पण त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे हे गमतीत म्हणाले असतील किंवा युती काहीतरी बिनसले असल्याचे ते संकेत तरी असतील. मात्र युती होणारच अशी ग्वाही यापूर्वी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा दिली आहे. शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्तेही युती होणार हे लक्षात घेऊनच काम करत आहेत. त्यामुळे आता फिसकटलेली युती यापैकी कोणालाच नको आहे.

- Advertisement -

आकडेवारीबद्दल काहीही बोललो नाही
जागा वाटप माझे मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बरोबर ठरले आहे. मी आकडेवारीबद्दल काहीही बोललो नाही.
जे काय ठरले आहे, ते तुमच्या सर्वांच्या समोर ठरले पण जे काय सध्या ऐकायला येते आहे, एवढ्या जागा देणार तेवढ्या जागा देणार त्यामुळेच मी बोललो की सर्व मुख्यमंत्र्यांनीच ठरवावे, पण परत एकदा सांगतो आमचे ठरले आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नंतर खुलाशात सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -