घरताज्या घडामोडी...आणि मी चार दिवस झोपलोच नाही, लॅबमध्ये आलेला अनुभव मुख्यमंत्र्यांकडून शेअर

…आणि मी चार दिवस झोपलोच नाही, लॅबमध्ये आलेला अनुभव मुख्यमंत्र्यांकडून शेअर

Subscribe

नायर रुग्णालयाला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नायर रुग्णालयातील जिनोम सिक्वेनसिंग युनिटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुर्मिळ आाजारावरील ‘स्पिनरजा’ कार्यक्रमाचे उद्धाटन झाले. राज्यात एसएमए या दुर्मिळ आजारानेग्रस्त असलेल्या १९ रुग्णांना मोफत उपचार करण्याची व्यवस्था नायर रुग्णालयात करण्यात आली आहे. तसेच जिनोम सिक्वेसिंगच्या या लॅबमध्ये एका वेळी ४०० नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार असून चार तासांत त्याचा अहवाल मिळणार आहे. शतकपूर्तीनिमित्त आज कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह पब्लिक हेल्थ कमिटी अध्यक्ष राजुल पटेल, डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. यासर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक छोटासा किस्सा सांगितला. त्याच्यासोबत एक अशी घटना घडली की, ज्यानंतर ते चार दिवस झोपले नाहीत.

मुख्यमंत्र्यांचा तो किस्सा

सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करताना अनेकांना दीर्घायुष्य देणाऱ्या शतायुषी नायर रुग्णालय सेवेला प्रणाम करत सर्व डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि शतकोत्तर वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते म्हणाले की, ‘डॉक्टर हा एक खतरनाक माणूस आहे, असं एका कार्यक्रमात मी म्हणालो होतो. जेव्हा डॉ. संजय ओक नायर रुग्णालयाचे डीन होते. त्याचे फोटो मला काल डॉ. देसाईंनी पाठवले होते. त्यावेळेस एनाटॉमीचे (Anatomy) म्युझियम आपण नायरमध्ये करत आहोत, याचे आमंत्रण दिलं होतं. मी एक आर्टिस्ट आहे. आमची एनाटॉमी म्हणजे चित्रकला, पेन्सिल. यासाठी देखील एनाडॉमी लागते. मसल्स कुठून कसा जातो? त्याचाही अभ्यास कलाकारांना करावा लागतो. तर मला वाटलं, जे आमच्या कॉलेजमध्ये होतं, असं तुम्ही काहीतरी करत असालं. त्यामुळे मी हो म्हटलं आणि नंतर तिथे आलो. आल्यानंतर त्या दालनाचं उद्घाटन केलं. फेरी मारली आणि नंतर चार दिवस झोपलोच नाही. कारण सगळं काही प्रत्यक्षात पाहिलं. कारण आम्ही चित्र काढलं पण आतड्याची वैगेरे काढली नाहीत. आपण इतिहासात ऐकतो अफझल खानाचा कोथळा काढला. पण कोथळा कसा असतो? हे त्यादिवशी मला दिसलं. ते दिसल्यानंतर मी काही चार दिवस झोपू शकलो नाही.’

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

  • डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी हे रुग्णसेवेचे आयुष्य जगतांना इतरांना जगवत आहे ही गोष्ट खूप मोठी आहे.
  • सध्या राज्यात कोरोनाची साथ आहे. हे विषाणु विरुद्धचे युद्ध आहे. या युद्धात लढण्यासाठी डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसारखे सैनिक महत्वाचे. त्यांच्याशिवाय हे युद्ध आपण जिंकू शकत नाही. आपण खरे या युद्धातील सैनिक आहात.
  •  मुंबईत २००५ ला अतिवृष्टी झाली आणि त्यावेळी पावसाचे पाणी सर्वत्र साचले. त्यानंतर लिप्टोची साथ आली. लिप्टोसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी पुण्याला नमुने पाठवावे लागत. त्याचा रिपोर्ट येऊ पर्यंत रुग्ण बरा होऊन घरी जात होता किंवा दुर्देवाने मृत्यू होत होता त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी विषाणु चाचणी प्रयोगशाळा असणे अत्यंत महत्वाचे होते, त्यामुळेच पालिकेने पुढाकार घेऊन विषाणु चाचणी प्रयोगशाळा स्थापन केल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.
  •  नायर रुग्णालयाने १०० वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून हे रुग्णालय आणि आपण डॉक्टर मंडळी रुग्णांना जगवण्याचे काम करत आहात.
  • नायर रुग्णालयाचा जन्मच मुळात साथ रोगाच्या काळात. त्यास आता १०० वर्ष होत आहेत. या काळात जे आजार आले, साथी आल्या त्यावर आपण नेटाने उपचार करत आहोत.
  •  स्पायनर मस्क्युलर ॲट्राफी सारख्या आजारावर उपचार करण्याची सुविधा आपण नागरिकांना देत आहोत.
  • सध्या आपला कोरोनासारख्या छुप्या शत्रुशी युद्ध सुरू आहे. या आणि इतर साथ रोगाच्या विषाणुचे अवतार लवकरात लवकर शोधून वेळेत उपचार करणे, त्यावर त्वरेने हालचाल करणे नायरमध्ये सुरु करण्यात आलेल्या लॅबमुळे शक्य होणार आहे.
  • कोरोनाची वाढ जिथे जिथे होते तिथल्या विषाणुला शोधून काढणे, त्याचे जनुकीय परिणाम शोधणे गरजेचे असते. नसता अनर्थ घडतो. जेवढा विषाणुचा प्रकार ओळखण्यास उशीर तितके त्याचे परिणाम समजून घेंणेही कठीण असते हे कोरोना विषाणुवरून आपणास दिसून आले आहे. त्यामुळे नायरमध्ये सुरु झालेली जिनोम सिक्वेन्सिंग लॅब स्थापन करण्याची इच्छा महापालिकेने पूर्ण करून दाखवली. बऱ्याचदा असे काम करायचे तर कुणी करायचे असते हा प्रश्न असतो पण इतर कुणीही नाही, आम्हीच करून दाखवणार हे महापालिकेने निश्चित केले आणि ते करून दाखवले. त्यासाठी शासन आणि महापालिकेवर आर्थिक भार न टाकता त्यांनी सीएसआर निधीतून हे काम केले.
  • नायरच्या शताब्दी वर्षातली ही मोठी आठवण नेहमी लक्षात राहील.
  • रुग्णसेवेस मदत करणे, त्यासाठी कोट्यावधीची यंत्रे खरेदी करण्यासाठी रक्कम देणे, निधी दान करणे महत्वाचे. या लॅबच्या उभारणीसाठी दान देणाऱ्या सर्व दात्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार.
  •  स्पायनल म्स्क्युलर ॲट्रोफी सारख्या दुर्धर आजारापासून बालकांना वाचवण्याची गरज. या आजारावरील खर्च हा कोट्यावधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी वेदिका शिंदे या बालिकेचे याच आजाराने निधन झाले. तिला १६ कोटी रुपायांचे इंजेक्शन देऊनही आपण तिला वाचवू शकलो नाही. परंतू भविष्यात या आजाराने लहान मुले दगावू नयेत म्हणून महापलिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत, त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या आजारावरील उपचारासाठी आणि इतर गोष्टींसाठी शासन पुर्णत: सर्वांच्या पाठीशी आहे.
  • तुम्ही सर्वजण परीक्षा देत आहात त्यामुळे या सर्व श्रेयाचे मानकरी तुम्ही आहात.
  • जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आपण सुरू करतो आहोत, अजूनही भविष्यात आपण आरोग्य सुविधा आपण उभ्या करू. पण मी नेहमी म्हणतो तसे, या सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये हीच मी प्रार्थना करतो. रुग्णांना या आजारावर उपचार घेण्याची वेळच न येवो.
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -