घरमुंबईमालाडचे अस्लम शेख नक्की कुणीकडे? शिवसेना की काँग्रेस?

मालाडचे अस्लम शेख नक्की कुणीकडे? शिवसेना की काँग्रेस?

Subscribe

काँग्रेसचे मालाड पश्चिमधले आमदार अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून त्याची पुष्टी देणारा शिवसेनेचा एक बॅनर या मतदारसंघात चर्चेत आला आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या ६ विधानसभा जागांपैकी ही एकमेव जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. अस्लम शेख हे सध्या मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र, आता ही जागा देखील हातून जाऊन उत्तर मुंबईतून काँग्रेसचा सुपडा साफ होणार की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अस्लम शेख लवकरच शिवसेनेच प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून त्याची पुष्टी करणारा एक बॅनर नुकताच समोर आला आहे. शिवसेनेच्या या बॅनरवर शिवसेनेचे स्थानिक दिग्गज नेते झळकत असताना त्यामध्येच काँग्रेसच्या अस्लम शेख यांचा देखील फोटो दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोखाली काँग्रेसच्या ऐवजी शिवसेनेचं चिन्ह दिसत आहे. त्यामुळे नक्की अस्लम शेख कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न या बॅनरवरून विचारला जात आहे.

सेना-भाजपच्या जागावाटपावर ठरणार?

२०१४मध्ये भाजपच्या राम बरोत यांचा अवघ्या १३०० मतांनी पराभव करणारे अस्लम शेख मालाड पश्चिममधील काँग्रेसचा चेहरा आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांच्या पाठोपाठ अस्लम शेख हे देखील सत्ताधारी पक्षांमध्ये जाऊन बसणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम शेख यांचा शिवसेना प्रवेश हा युतीमधल्या जागावाटपावर अवलंबून आहे. जागावाटपामध्ये भाजपनं मालाड पश्चिम ही जागा मागितली असून त्याबदल्यात गोरेगावची जागा शिवसेनेला सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर युती झाली, तर अस्लम शेख यांना मालाड पश्चिममधल्या आपल्या हक्काच्या तिकिटावर पाणी सोडावं लागेल. आणि काँग्रेसकडूनच पुन्हा निवडणूक लढले, तर त्यांना भाजपच्या तगड्या प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे सध्या अस्लम शेख द्विधा मन:स्थितीत असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

वाचा – मालाड पश्चिम मतदारसंघातली राजकीय गणितं!

बॅनरवर चर्चा!

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या चिन्हासह अस्लम शेख यांचा फोटो शिवसेनेच्या बॅनरवर झळकल्यामुळे पुन्हा एकदा अस्लम शेख यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, जोपर्यंत शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाविषयी निश्चित फॉर्म्युला ठरत नाही, तोपर्यंत अस्लम शेख कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार? हे नश्चित होऊ शकणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -