घरCORONA UPDATEमहापालिका मुख्यालयातील आणखी एका सुरक्षा रक्षकाला कोरोना!

महापालिका मुख्यालयातील आणखी एका सुरक्षा रक्षकाला कोरोना!

Subscribe

विशेष म्हणजे हा सुरक्षा रक्षक तीन दिवसांपासून मुख्यालयात राहत असून सेवाही बजावत होता.

मुंबई महापालिके सुरक्षा खात्यातील उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यासह नायर व कस्तुरबा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर, सोमवारी महापालिका मुख्यालयातील एका सुरक्षा रक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे हा सुरक्षा रक्षक तीन दिवसांपासून मुख्यालयात राहत असून सेवाही बजावत होता. त्यामुळे मुख्यालयात राहणाऱ्या अन्य सुरक्षा रक्षकांसह सेवा बजावणाऱ्या जवानांमध्येही आता भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यालयाला कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.

महापालिका मुख्यालयात सुरक्षा खात्यात कार्यरत असलेला जवान राहत असलेल्या ठिकाणी त्याच्या सहकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर या जवानांने सामानासह मुख्यालय गाठले आणि इथेच राहण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या सहकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे हा जवान इथे राहत असून सेवाही बजावत असल्याने इतर जवानांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो, अशाप्रकारची तक्रार येथील जवानांनी वरिष्ठांकडे केली होती. परंतु वरिष्ठांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु सहकाऱ्यांनी त्याला कोरोनाचा चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने चाचणी केली आणि सोमवारी याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला तात्काळ अलगीकरण केंद्रात अर्थात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून हा जवान मुख्यालयातील गॅरेजमध्ये स्वतंत्र राहत असला तरी इतर जवान आंघोळीसाठी ज्या न्हाणीघराचा वापर करायचा, त्याचाच वापर करत असे. तसेच जेवणासाठीही एकत्र बसत असे. शिवाय मुख्यालय इमारतीत त्यांचा संचार असेल. त्यामुळे त्यांच्यासोबत मुख्यालयात राहणाऱ्या जवानांसह त्यांच्यासोबत ड्युटी करणाऱ्या जवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यासर्वांनी आपली कोरोना चाचणी करण्याची मागणी होत आहे.

महापालिका मुख्यालयात यापूर्वी आपत्कालिन विभागाचे तीन कामगार व मालमत्ता विभागाच्या एका कामगाराला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याने मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत सुरक्षा विभागाचे १० हून अधिक जवानांना बाधा झाली असून त्यातील आठ जवाना बरे होवून घरी परतले आहेत. तर महापालिकेच्या सर्व सुरक्षा रक्षकांना मास्क, सॅनिटायझरसह इतर वस्तूंचे वाटप करता उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झालेली असून त्यांच्यावर अद्याप कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -