घरCORONA UPDATEखुशखबर! धारावीत दिवसभरात केवळ १८ बाधित रुग्ण!

खुशखबर! धारावीत दिवसभरात केवळ १८ बाधित रुग्ण!

Subscribe

मागील महिन्यापासून कोरोनाने कहर माजवलेल्या धारावीत आता या साथीचा आजार काढता पाय घेण्याच्या तयारीत असण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत दिवसाला ९० पर्यंत रुग्णसंख्या गेलेल्या धारावीत आता सरासरी रुग्णांचा निर्देशांक कमी होताना दिसत आहे. दिवसभरात धारावीत केवळ १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत १८ आणि १९ एप्रिल रोजी रुग्णांची संख्या एवढी आढळून आली होती. सव्वा महिन्यात धारावी पूर्वपदावर येण्याची चिन्हे या कमी झालेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहेत.

धारावीत दिवसभरात १८ रुग्ण आढळून आले असून एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांचीची संख्या १९४०वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे एका बाजूला रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी ही संख्या केवळ १८वर आली आहे. त्यातच प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये दिवसभरात ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय दामोदर इमारत, लाल बहादूरशास्त्री नगर, आझाद नगर, जयभवानी नगर, मित्रसंगम, मुकुंद नगर, नेताजी सोसायटी, पीएमजीपी कॉलनी, कुंभारवाडा, धारावी क्रॉस रोड, ६० फुटी रस्ता, गुलमोहम्मद चाळ आदी ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

- Advertisement -

सार्वजनिक शौचालयांच्या सॅनिटायझेशनवर भर

या कोरोना काळात धारावीतील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता आणि सॅनिटाईझेशन करण्यासाठी मुंबई महापालिकेत सर्वप्रथम जी/उत्तर विभागामार्फत काम सुरु केले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रसार थांबवण्याच्या अनुषंगाने या कामाकरिता २३ मार्च २०२० पासून अशासकीय संस्थेची त्वरीत नेमणूक करुन सफाईचे काम सुरु करण्यात आले. सुरूवातीला हे काम दिवसातून कमीत-कमी २ वेळा करण्याकरता धारावीतील ७ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ कामगार आणि स्वतंत्र पंपांची व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रीय तपासणी पथकाने धारावी येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी याबाबत काही सूचना केल्या. त्या अनुषंगाने अजून एका अशासकीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली आणि या संस्थेकडून पुन्हा दिवसातून २ वेळा सॅनिटाईज करण्यात येत आहे. सद्यस्थितीत धारावीतील सर्व अर्थात १४०० सार्वजनिक शौचालयांच्या सॅनिटाझेशनची कामे नियमितपणे सकाळ आणि रात्रपाळी या पद्धतीने दररोज किमान चार ते पाच वेळा करण्यात येत आहेत. सॅनिटाझेशनच्या या कामाबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -