घरमुंबईबाप्पाचा वेशभूषाकार.... ते शंभर फेटे बांधणारा अवलिया - प्रदीप पेडणेकर

बाप्पाचा वेशभूषाकार…. ते शंभर फेटे बांधणारा अवलिया – प्रदीप पेडणेकर

Subscribe

पेडणेकर यांना शंभर प्रकारचे फेटे बांधण्याची कला अवगत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फेटे बांधून घेण्यासाठी अनेकांची गर्दी होत असते.

ठाणे : बाप्पाची वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बरोबरच बाप्पाची वेशभूषा हा ही भाविकांच्या आवडीचा विषय ! दागिन्यांचा साज, पितांबर, फेटा आणि शाल अशी बाप्पाची वेशभूषाही साकारली जाते. डोंबिवलीत राहणारे प्रदीप पेडणेकर हे गेल्या २० वर्षांपासून बाप्पाची वेशभूषा साकारत आहेत.

विशेष म्हणजे ते स्वतःच्या हाताने या सगळ्या वस्तू बनवून ते बाप्पाची मूर्ती सजवतात. दरवर्षी मुंबई- ठाण्यात ५० च्या आसपास गणेशमूर्तींची वेशभूषा ते साकारतात. अनेक नाटक व चित्रपटात त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. आणि विशेष म्हणजे पेडणेकर यांना शंभर प्रकारचे फेटे बांधण्याची कला अवगत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फेटे बांधून घेण्यासाठी अनेकांची गर्दी होत असते.

- Advertisement -

बाप्पासाठीची सजावट म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. तन- मन -धन लावून प्रत्येक जण बाप्पाच्या सजावटीची तयारी करतो. पण गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पाची वेशभूषा करण्यासाठी पेडणेकर यांना बोलावले जाते. बाप्पाच्या मूर्तीनुसार त्यावर साज करण्याचे काम पेडणेकर हे अनेक वर्षापासून करीत आहेत. मूर्ती तयार होताना आणि मूर्ती तयार झाल्यानंतर अशा दोन्ही प्रकारे ते वेशभूषा करतात.

बाप्पासाठी त्यांनी मुकुट, फेटा, शाल, रुमाल, बिग बाळी, लटकन, कंठ्या, हार अशा विविध प्रकारच्या वस्तू स्वतः हाताने बनवून त्या बापाला परिधान करतात. या कामात त्यांना रश्मी आणि शाम पाटील यांची मोलाची मदत लाभते. एका मूर्तीची सजावट करण्यासाठी साधारण ५ ते ६ तास लागतात. आतापर्यंत पेडणेकर यांनी ५० गणपतींची वेशभूषा साकारली आहे. तसेच बाप्पाला पितांबर नेसण्यासाठी त्यांना बोलावले जाते.

- Advertisement -

मुंबईच्या लालबाग परिसरात बालपण गेलेल्या पेडणेकर हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून डोंबिवलीत स्थायिक झाले आहेत. परेल येथील शिरोडकर शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शाळेच्या वयातच बालनाट्यात सहभागी होत ते उत्तम वेशभूषाकार झालेत. ज्योतिराम कदम यांच्या बालनाटयातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. शाळेतील नाबर सरांनी त्यांच्यातील सुप्त गुण हेरले आणि त्यांच्यावर शाळेच्या संमेलनातील वेशभूषेची जबाबदारी सोपवली. ते आता वेशभूषाकार म्हणूनच नावारूपाला आले. ” तो ची एक समर्थ “, ” तूच माझी भाग्यलक्ष्मी “, ” रमाई ” अशा विविध चित्रपटात तर इ टीव्ही वरील मराठी ” एक होता राजा ” अश्या अनेक नाटकाचे वेशभूषा साकारली. विनय आपटेंचा छत्रपती शिवराय नाटकासाठी त्यांनी सहाययक वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे.

गणेशोत्सवातून कलाकार घडतात..

शंभर फेटे बांधणारा एक अवलिया आहे असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वासच बसणार नाही. पण वेशभूषाकार प्रदीप पेडणेकर यांनी ती कला अवगत केली आहे. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यातही महाराष्ट्रात २५२ लोककला आहेत. प्रत्येक राज्याचा लोककलेचा विचार केला तरीसुध्दा साधारण हजार ते दीड हजार लोककला होतील. राज्स्थानी फेटा, पंजाबी फेटा, कोल्हापुरी फेटा, सोलापुरी फेटा, मद्रासी फेटा, राजस्थानी पगडी, गुजराती फेटा धनगरी, शेतकरी फेटा असे विविध प्रकारचे शंभर फेटे बांधण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. शासनाकडून विविध प्रकारचे सांस्कृतिक कला महोत्सव साजरे होतात. त्यातील तीनशेच्या आसपास महोत्सवात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यात विविध राज्याचे कलाकार, वेशभूषाकार येत असत. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्व वेशभूषाकार एकत्रित भेटत. प्रत्येकाच्या कलेची देवाण- घेवाण आम्ही करतो. त्यातूनच फेटे बांधण्याची कला शिकलो, असे पेडणेकर सांगतात. देशात २ हजार प्रकारे साडया नेसण्याची पध्दत असल्याचेही ते सांगतात. गणेशोत्सव हा कलाकारांच्या जननीचा उत्सव असतो. हा कलाकार घडवणारा मोठा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार जन्माला येतात. कलाकारांना आपली कला सादर करता येते. त्यातूनच माझ्यातील कलाकार ही घडला, असे प्रदीप पेडणेकर सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -