नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात; १०० स्वयंसेवकांवर करणार चाचणी 

केईएमपाठोपाठ आता नायरमध्ये कोव्हीशिल्ड चाचणीच्या स्क्रीनिंगला सुरूवात झाली. नायरमध्ये २० स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.

corona test
केईएमपाठोपाठ आता नायरमध्ये कोव्हीशिल्ड चाचणीच्या स्क्रीनिंगला सुरूवात झाली. नायरमध्ये २० स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. सध्या ३ स्वयंसेवकांना कोव्हीशिल्डची लस देण्यात आली आहे.
 
कोव्हीशिल्ड लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी केईएम आणि नायर रुग्णालयात करण्यात येणार होती. त्यानुसार शनिवारी केईएममध्ये चाचणीला सुरुवात झाल्यानंतर आता नायरमध्यही चाचणीला सुरुवात झाली आहे. सोमावारी तिघांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर त्यांना एक तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. कोव्हीशिल्ड चाचणीसाठी  नायरमध्ये २० जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे. कोव्हीशिल्ड चाचणीसाठी १०० जणांचे टप्प्याटप्प्याने स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. स्क्रीनिंग केलेल्या २० जणांपैकी तिघांना कोव्हीशिल्डची लस दिली. तिन्ही स्वयंसेवकांना कोणत्याही आजाराचा इतिहास नाही. स्क्रिनिंग दरम्यान त्यांच्या आरटी-पीसीआर आणि अँटीबॉडी चाचण्याही करण्यात आल्या आहेत.  दुसर्‍या टप्प्यात आम्ही त्यांच्या सुरक्षेचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करू. यानंतर काही दुष्परिणाम दिसले तर त्याचीही माहिती घेण्यात येणार आहे. असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
स्वयंसेवकांना एक कोटींचे विमा संरक्षण
नायर आणि केईएम रुग्णालयाला चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर विमा सरंक्षण मिळण्यासाठी मुख्य रुग्णालयाचे संचालक असलेल्या डॉ. रमेश भारमल यांनी आयसीएमआरशी संपर्क केला होता. आयसीएमआरने स्वयंसेवकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. स्वयंसेवकाचा चाचणीदरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच, लसीकरणामुळे काही विपरीत परिणाम झाल्यास ५० लाखांचा वैद्यकीय विमा देण्यात येणार आहे.