मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना ‘क्विम्प्रो २०२१’ पुरस्कार व पदकाने सन्मानित

crimpo 2021 award given to mumbai municipal commissioner iqbal singh chahal
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना 'क्विम्प्रो २०२१' पुरस्कार व पदकाने सन्मानित

मुंबईत विविध उपाययोजना युद्धपातळीवर अवलंबून वाढलेल्या ‘कोविड-१९ विषाणू संसर्ग’ पूर्णपणे नियंत्रणात आणण्याची मोठी कामगिरी बजावणारे पालिका आयुक्त इकबाल चहल यांना, ‘क्विम्प्रो २०२१’ हा पुरस्कार व पदक’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे. कोविड व्यवस्थापनातील या यशस्वी कामगिरीबद्दल आयुक्त इकबाल चहल यांना यापूर्वीदेखील विविध पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले आहेत.

मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव खूपच वाढलेला असताना अचानकपणे पालिका आयुक्त पदावरून प्रवीण परदेशी यांची गच्छंती करून इकबाल चहल यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. आणि तेथूनच मुंबईतील कोविडचा संसर्ग कमी होण्यासाठी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आयुक्त इकबाल चहल यांनी, कोविड संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी स्वतः हॉटस्पॉट असलेल्या धारावी व अन्य भागात भेट देऊन व पाहणी करून युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या. त्यासाठी पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींचे मोठे योगदान लाभले. त्यामुळेच आज मुंबईत कोविड नियंत्रणात आलेला असून अनेक बंधने शिथिल करून जनजीवन सुरळीत होत आहे.

पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केलेल्या या असाधारण कामगिरीबद्दल आणि ‘मुंबई मॉडेल’ च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थापनामध्ये आदर्श उदाहरण निर्माण केल्याबद्दल आरोग्य व शिक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी कार्यरत ‘क्विम्प्रो फाऊंडेशन’द्वारे हा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तिपत्र इकबालस चहल यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या जपान देशाला सावरण्यासाठी गुणवत्ता सुधारणा आणि गुणवत्ता व्यवस्थापन या अनुषंगाने मार्गदर्शन करणारे आणि ‘क्वालिटी गुरु’ म्हणून जगभरात नावाजलेले डॉ. जे. एम. जुरान यांनी भारतातही गुणवत्तेवर भर देणारी राष्ट्रीय संस्कृती निर्माण व्हावी म्हणून क्विम्प्रो फाऊंडेशनच्या स्थापनेला बळ दिले. तसेच आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता, या क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यासाठी क्विम्प्रो पुरस्कार सुरु करण्याची संकल्पनाही त्यांनी दिली. त्यानुसार या फाऊंडेशनच्या वतीने सन १९८९ पासून आतापर्यंत फक्त चार वेळा पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासाठी अत्यंत असाधारण कामगिरी हा निकष प्रामुख्याने लक्षात घेतला जातो.

मुंबईमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग परिस्थिती रोखण्यासाठी वॉर्ड वॉर रुम अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांची अनोखी संकल्पना राबवून केलेले कोविड रुग्ण व्यवस्थापन, वैद्यकीय उपचारांसाठी अल्पावधीमध्ये उभारलेली निरनिराळी जम्बो कोविड सेंटर्स, टेस्टींग-ट्रेसिंग-ट्रॅकींग-ट्रिटमेंट या सूत्राच्या आधारे राबविलेली धोरणे, कोविड व्यवस्थापनामध्ये एकूणच प्रेरणादायी ठरलेले ‘मुंबई मॉडेल’, धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोविडवर राखलेले नियंत्रण अशा सर्वंकष कामगिरीचे नेतृत्व करुन असाधारण अंमलबजावणी केल्याबद्दल कौतुक करीत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना क्विम्प्रो फाऊंडेशनने पदक, पुरस्कार व प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित केले आहे.