घरदेश-विदेशकॅश कॉईन योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणुक

कॅश कॉईन योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणुक

Subscribe

कॅश कॉईन योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सुरत शहरातून चार भामट्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात इतर चार आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. संजय काशिराम सोनटक्के, रजनीकांत भक्तीराम कुबावत, अल्पेश भायाभाई भारोडिया आणि किरणकुमार वनमानीदास पंचसारा अशी या चौघांची नावे आहेत. चारही आरोपी मूळचे गुजरातच्या सुरत शहरातील रहिवाशी असून अटकेनंतर या चौघांना येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

उमेशचंद अनुपचंद जैन हे व्यवसायाने व्यापारी असून ते गुजरातच्या सुरत, कामरेज व्हिलेज रोडवरील निळकंठ रेसीडेन्सी बंगलोमध्ये राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची रजनीकांत कुबावत याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने क्रिप्टो करन्सीच्या कॅश कॉईन या योजनेची त्यांना माहिती देऊन त्यात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. या योजनेत गुंतवणtक केल्यास गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर साठ दिवसांत रक्कम दुप्पट होईल असे सांगितले होते.

- Advertisement -

१ कोटी १२ लाख गुंतवले
हीच योजना या आरोपींनी इतरांनाही सांगून त्यांना तिथे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर उमेशचंद जैन व त्यांच्यासह इतरांनी या योजनेत एक कोटी बारा लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. डिसेंबर 2016 ते डिसेंबर 2017 या कालावधीत ही रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र गुंतवणुकीसाठी घेतलेली ही रक्कम त्यांनी दुसर्‍याच कंपनीत जमा केली होती. सहा महिने उलटूनही या सर्वांना कॅश कॉईन देण्यात आले नाही. अशा प्रकारे या भामट्यांनी सहा महिन्यांत दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून कॅश कॉईन न देता या सर्वांची फसवणुक केली होती.

सुरत येथून आरोपींना अटक
हा उघडकीस येताच उमेशचंद जैन यांच्यासह इतरांनी लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना तपासाचे आदेश दिले होते. तपासात हा संपूर्ण घोटाळा दहिसर परिसरात झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे दहिसर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध अपहार, फसवणुकीसह इतर भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासानंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. हा तपास हाती येताच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सुरत शहरातून चारही आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला.

- Advertisement -

अनेकांना फसवले
अटकेनंतर चारही आरोपींना येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात इतर चौघांची नावे समोर आली आहे. त्यात अशोक गोयल, आसिफ मलकानी, बलजितसिंग सैनी आणि सोनू दहिया यांचा समावेश आहे. या चौघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी आता शोधमोहीम सुरु केली आहे. या टोळीने गुंतवणुकीसाठी घेतलेल्या रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक तसेच खर्च केल्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. मुंबईसह इतर शहरातही अशाच प्रकारे अनेकांची या टोळीने फसवणूक केल्याची शक्यता असून त्याचा तास सुरु आहे. त्यांची कॅश कॉईन ही योजना मूळात अस्तिवात होती का याचाही आता पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -