घरमुंबईदुग्धपेढी - नवजात बालकांसाठीची भेट

दुग्धपेढी – नवजात बालकांसाठीची भेट

Subscribe

मातृ दुग्धपेढीमुळे अनेक बालकांना आईचे दूध मिळण्यास मदत होते. केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जे.जे हॉस्पिटल, कामा हॉस्पिटलमध्ये सध्या मातृदुग्धपेढी सुरू करण्यात आली आहे

एखाद्या बाळाच्या जन्मानंतर त्याच्यासाठी सर्वात अमूल्य भेट असते ती म्हणजे आईचे दूध. पण चिमुकल्याच्या जन्मानंतर आईचा मृत्यू झाल्यास काय करायचं हा प्रश्न अवघड असतो. अशावेळी कुणी इतर स्त्री त्या बाळाची माता बनायला धावून येते. इतिहासात डोकावलं, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मानंतर आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचं पोषण दुधमातेने केले. आजारी माता, मातेला दूध न येणे, तिचा मृत्यू होणे अशावेळी बाळाला दूध मिळावे यासाठी आपल्याकडे एक माता आपले दूध दुसर्‍या बाळाला पाजते. परंतु, प्रत्येक बाळाला दूध पाजणारी आई मिळेलच असे नाही. ही गरज लक्षात घेऊन आपल्याकडे १९८९ मध्ये मातृ दुग्धपेढीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे मातृदुग्धपेढी ही संकल्पना आता नवीन राहिली नाही. पण तरीही तिचा प्रचार-प्रसार नीटपणे झाला नसल्याचे दिसते.

१९८९ साली पहिली दुग्धपेढी

बाळाच्या जन्मानंतर त्याला आईचे दूध मिळणे फार महत्त्वाचे असते. जन्मानंतर बाळाला आईचे दूध मिळल्यास त्याचे आरोग्य उत्तम राहते. त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पण अनेकदा प्रसुतीवेळी मातेचा मृत्यू होणे, माता आजारी पडणे, माता घाबरणे, मातेला दूध न येणे किंवा दूध सुकणे यामुळे त्यांना दूध मिळत नाही. त्यामुळे त्या बाळांना पोषकतत्त्वे मिळत नाहीत. अशावेळी मातृदुग्धपेढी ही या बाळांसाठी फारच महत्त्वाची ठरते. मुंबईमध्ये सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात १९८९ साली २७ जूनला डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी पहिली दुग्धपेढी सुरू केली. सुरुवातीला या पेढीमध्ये दुग्धदानासाठी फारशा माता येत नसत. पण सरकारकडून झालेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांपासून दुग्धपेढीला आता बरा प्रतिसाद मिळतो आहे.

- Advertisement -

लोकमान्य टिळक रुग्णालयात दरवर्षी साधारण तीन ते साडेतीन हजार बालके जन्माला येतात. यातील ५० टक्के बाळांना काहीना काही कारणाने बाहेरून दूध देण्याची गरज असते. पण दुग्धपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात दूध जमा होत नसल्याने प्रत्येक बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळे कमी वजन असलेले बाळ, वेळेपूर्वी जन्माला आलेले बाळ, पोटाच्या समस्या असलेले बाळ, अवघड शस्त्रक्रिया करून जन्माला आलेले बाळ अशांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यानंतर उरलेले दूध किरकोळ आजारी बालकांना दिले जाते. 

-डॉ. स्वाती मणेरकर, नवजात अर्भकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक, सायन रुग्णालय

- Advertisement -

ज्या मातांना दूध येत आहे पण त्यांचे बाळ आजारी असल्याने ते दूध पित नाही अशा मातांनी दुग्धपेढीसाठी दूध द्यावे यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाते. तसेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या मातांना दुग्धपेढीसाठी दूध देण्याबाबत त्यांना विनंती करण्यात येते, त्यामुळे मातृ दुग्धपेढीमुळे अनेक बालकांना आईचे दूध मिळण्यास मदत होते. केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जे.जे हॉस्पिटल, कामा हॉस्पिटलमध्ये सध्या मातृदुग्धपेढी सुरू करण्यात आली आहे, असे डॉ. स्वाती मणेरकर यांनी सांगितले.

कशी बनते दुग्धपेढी ?

अनेकदा काही मातांना मोठ्या प्रमाणात दूध येत असते. दुग्धपेढीबाबत रुग्णालयात या महिलांना माहिती दिल्यावर त्या आपल्याला येणारे अधिकचे दूध दुग्धपेढीला देतात. पण हे दूध घेण्यापूर्वी त्या मातेच्या एचआयव्ही, हेपेटायटीस बी, व्हीडीआरएल यासारख्या अनेक चाचण्या केल्या जातात. या चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर या मातांचे दूध पंपने काढले जाते. दुधाचे प्रमाण १०० ते १५० मिलीपर्यंत असते. हे दूध प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये जमा केले जाते. त्यानंतर दुधाचे काही नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येतात. या चाचणीनंतर हे दूध जंतूविरहित करण्यासाठी दूध अर्धा तास ६२.५ अंश सेल्सियसच्या तापमानापर्यंत उकळवले जाते. त्यानंतर ते २५ अंश सेल्सियसपर्यंत थंड केले जाते. दूध थंड झाल्यानंतर ते फ्रिजरमध्ये ठेवण्यात येते आणि गरजेनुसार वॉर्डमधील बाळांना देण्यात येते.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -