घरदेश-विदेशकुमारस्वामींनी शब्द पाळला! कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी

कुमारस्वामींनी शब्द पाळला! कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांसाठी ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन एच.डी. कुमारस्वामी यांनी दिले होती. अखेर दिलेला शब्द पाळत कर्नाटकातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटी रूपयापर्यंतचे कर्ज माफ करत असल्याची घोषणा कुमारस्वामी यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभेत २०१८-१९ सालचे आर्थिक बजेट सादर करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कुमारस्वामींनी केलेल्या घोषणेनुसार ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. यापूर्वी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. कर्नाटकात सध्या काँग्रेस आणि जनता दल ( सेक्युलर )चे सरकार आहे. काँग्रेसचे संख्याबळ जास्त असले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएस सोबत युती करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. २३ मे २०१८ रोजी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

कर्जमाफीकरून भाजपला शह

कर्नाटकामध्ये सत्तास्थापनेवरून मोठ्या प्रमाणावर राजकीय नाटक रंगले होते. भाजपच्या येडीयुरप्पांनी सत्ता स्थापनेचा दावा केला खरा पण ११७ आमदारांचा पाठिंबा मिळवणे येडियुरप्पांना जमले नाही. परिणामी २४ तासांच्या आत येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. हा सारा वाद न्यायालयात देखील पोहोचला होता. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस – जेडीएसने एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली होती. शिवाय कर्जमाफीच्या मुद्यावर कर्नाटक बंदची देखील हाक दिली होती. कुमारस्वामी यांनी कर्जमाफी करत भाजपला शह दिला आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा राजकीय फायदा हा जेडीएसला देखील नक्की होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -