घरमुंबईबारसूवरुन शिवसेनेत मतमतांतरे, राजन साळवींचा प्रकल्पाला पाठिंबा - अजित पवार

बारसूवरुन शिवसेनेत मतमतांतरे, राजन साळवींचा प्रकल्पाला पाठिंबा – अजित पवार

Subscribe

मुंबई : रत्नागिरीतील राजापूर रिफायनरीसाठी (Rajapur Refinery) होणाऱ्या सर्वेक्षणाविरोधात आज आंदोलन चिघळलेले पाहायला मिळाले. एकीकडे गावकरी आणि विरोधी पक्ष रिफायनरीला विरोध करत असतानाच बारसूवरुन शिवसेनेत मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनी प्रकल्पाला पाठिंबा दिला असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे खासदार बारसू प्रकल्पाला विरोध करतात, परंतु त्यांच्यासोबत असणाऱ्या राजन साळवी यांचे वक्तव्य मी स्वत: ऐकले आहे. ते त्या भागाचे प्रतिनिधत्व विधानसभेमध्ये करत आहेत आणि शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत. त्याचे म्हणणे आहे की, माझा पाठिंबा आहे. म्हणजे 4-5 लाख लोकांचे प्रतिनिधत्व करणारे आमदार म्हणतात आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणून माझी भूमिका आहे की, बारसू रिफायनरीमधून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल, त्या भागाचे नुकसान होणार नसेल, त्या भागातील जनजीवन, मासेमारी किंवा पर्यटन या सर्व गोष्टींवर कुठल्याही प्रकारचे परिणाम होणार नसेल तर, जे विरोध करत आहेत त्यांना समजवून सांगावे, त्यांना विश्वासात घ्यावे, त्याच्यामध्ये संवेदनशिलता सरकारने दाखवावी आणि समज-गैरसमज असतील तर, ते दूर करावे असे माझे स्पष्ट मत आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो हे आतापर्यंत महाराष्ट्रात आणि देशपातळीवर अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी एनरॉन प्रकल्पालाही त्या वेळीही एका वेगळ्या अर्थाने गावकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या बाबतीत फार काही समजून घेतले नव्हते. त्यांना असे वाटले की, प्रकल्पामुळे समुद्रामध्ये गरम पाणी जाणार आणि तिथले मासे मरणार. कोकणातले फळ जस की, आंबा, काजू किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या फळांवर परिणाम होईल. अस त्यावेळी बोलले जात होते, पण तस काही झाल नाही, हे आपण सर्वांनी पाहिले. त्यावेळी राजकीय दृष्टीकोनातून लोकांनी विरोध केला होता, असे अजित पवार म्हणाले.

गैरसमज दूर झाल्यानंतर एनरॉन प्रकल्प झाला
अजित पवार म्हणाले की, शरद पवार मुख्यमंत्री असताना एनरॉन प्रकल्प आणला, पण त्यावेळी विजेची कमकरता होती. त्यानंतर मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली जे युतीचे सरकार आले म्हणजे शिवसेना-भाजपाचे सरकार आल्यानंतर एनरॉनच्या लोकांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर गावकऱ्यांचे गैरसमज दूर झाले आणि तो प्रकल्प झाला. ही गोष्ट आपण सर्वांनी पाहिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही विकासाच्या प्रकल्पाला विरोध करताना आपल्या परिसराचे कायमचे नुकसान होणार असेल, पुढची भावी पिढी अक्षरश: बरबाद होणार असेल तर त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही, पण त्या प्रकल्पामधून फायदा होणार असेल, आर्थिक सुबकता येणार असेल तर, त्याही बाजूने विचार केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -