घरमुंबईनैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती हाताबाहेर

नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती हाताबाहेर

Subscribe

मुंबई म्हणजे गर्दी आणि त्या गर्दीची ओळख म्हणजे मुंबई लोकल. मुंबईच्या वेगाचं प्रतीक म्हणजे लोकल! त्यामध्ये मुंबईकरांना सर्वात उत्तम सेवा देणारी पश्चिम रेल्वे मुंबईकरांच्या मनात खास जागा करून आहे. मात्र मागच्या काही काळापासून सतत अपघातामुळे पश्चिम रेल्वे चर्चेत असते. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी दैनिक ‘आपलं महानगर’सोबत बोलताना बर्‍याच महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला.

मुंबई म्हणजे गर्दी आणि त्या गर्दीची ओळख म्हणजे मुंबई लोकल. मुंबईच्या वेगाचं प्रतीक म्हणजे लोकल! त्यामध्ये मुंबईकरांना सर्वात उत्तम सेवा देणारी पश्चिम रेल्वे मुंबईकरांच्या मनात खास जागा करून आहे. मात्र मागच्या काही काळापासून सतत अपघातामुळे पश्चिम रेल्वे चर्चेत असते. एल्फिन्स्टन आणि गोखले पूल दुर्घटना, वसई-विरारमध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती आणि पश्चिम रेल्वेची झालेली वाहतूक कोंडी यामुळे एकूण पश्चिम रेल्वेच्या कारभारावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी दैनिक ‘आपलं महानगर’सोबत बोलताना बर्‍याच महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला.

 एरवी उत्तम सेवेसाठी पश्चिम रेल्वे ओळखली जाते. सध्या मात्र ती दुर्घटना आणि कोंडीसाठी चर्चेत आहे. याची कारणं काय सांगाल?

पश्चिम रेल्वेने मुंबईकरांना नेहमीच उत्तम सेवा दिली आहे. त्यामुळे आमचीही ओळख खास आणि वेगळी अशी निर्माण झालीय. मुंबईकरांचाही आमच्यावर सार्थ विश्वास आहे. तो टिकवून ठेवण्यासाठी आम्ही अखंड प्रयत्नरत असतो. मागील काही कालावधीत ज्या घटना घडल्यात त्या खूप दुर्दैवी आहेत. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे पुरेपूर जागरूक आहे.

वसई आणि विरारमध्ये पूरस्थिती निर्माण होण्यामागचं कारण काय ?

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरावर जलसंकट ओढवले होते. त्यामुळे रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वसईपर्यंत सर्व रेल्वे गाड्या सुरळीत सुरु होत्या. कुठेही पाणी साचले नव्हते. वसई-नालासोपार्‍यामध्ये मात्र जलसंकट ओढवले होते. ती एक नैसर्गिक आपत्ती असल्याने पश्चिम रेल्वेच्या नियंत्रणाबाहेर होती. वसई-विरार महापालिकेनेसुद्धा याबद्दल नुकतेच एक परिपत्रक काढले. ज्या ठिकाणी आधी कधीही पाणी साचत नव्हते, त्या ठिकाणीही यंदा पावसाचे पाणी साचले. पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्गसुद्धा तुंबले होते. या सर्व गोष्टींची पाहणी स्वत: महापालिका करणार आहे. असं चित्र असताना आमच्यासमोर एकच आव्हान होतं, की प्रवाशांना सुखरूप बाहेर कसं काढायचं. त्यासाठी आम्ही सुरक्षा दलासोबत अहोरात्र कार्यरत होतो.

- Advertisement -

प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या होत्या?

वसई-विरारवर जलसंकट ओढवले होते तेव्हा पश्चिम रेल्वेच्या वसई आणि विरार दरम्यान रेल्वे ट्रकवर पाणी साचल्याने कित्येक रेल्वेच्या गाड्या मध्येच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वे आणि मुंबईतील समाजसेवी संस्था यांच्या मदतीने आम्ही २५ हजारपेक्षा जास्त नाश्ता आणि जेवणाची पॉकेट्स वितरित केली. नालासोपार्‍यामध्ये दोन ट्रेन फसल्या होत्या. त्यातील बडोदा एक्स्प्रेसच्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि इंडियन आर्मीची मदत घेण्यात आली होती. शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बाहेर काढून नायगावमध्ये जेवणाची व्यवस्था केली गेली होती. सोबतच दुसर्‍या गाड्यांना निश्चित स्थळांपर्यंत पोहचवण्यात आले होते. सुरतपासून मुंबईसाठीही बससेवा सुरु करण्यात आली होती. सोबतच डॉक्टरांचे युनिट पाठविण्यात आले होते. प्रवाशांना गैरसोय होऊन नये यासाठी हेल्पलाईन सुद्धा सुरु करण्यात येत आहे.

 मान्सूनमध्ये पश्चिम रेल्वेची तयारी अपुरी होती का?

पश्चिम रेल्वेची तयारी खरोखरच अपुरी नव्हती. उलट यंदा गेल्यावर्षीपेक्षा तयारी करण्यात आली होती. यावर्षी पश्चिम रेल्वेकडून ४५ किलोमीटरची नालेसफाई करण्यात आलीय. सोबतच आतासुद्धा नालेसफाई सुरु आहे. आतापर्यंत ६० क्युबिक कचरा उचलण्यात आलाय. मान्सून सुरु होण्यापूर्वी पावसाळ्यात पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत चालू राहावी यादृष्टीने रेल्वे रुळांदरम्यानची नालेसफाई, पंप बसवणे असे संपूर्ण काम करण्यात आले आहे. फक्त मागील चार दिवस सतत पाऊस असतानाही नालासोपार्‍यापर्यंत लोकल सेवा सुरळीत सुरु होती. मात्र नालासोपार्‍यापासून ते विरारपर्यंत पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून रेल्वेची हाताबाहेर परिस्थिती गेली होती.

- Advertisement -

 एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर काय उपाय केले गेले?

एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने संपूर्ण पुलाची तपासणी केली होती. त्यानंतर रेल्वे स्थानकांची गर्दी लक्षात घेता लिफ्ट, रॅम्प, सरकते जिने आणि कित्येक फूटओव्हर ब्रिजला मंजुरी मिळालीय. दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेकडून शक्य त्या रेल्वे स्थानकांचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र काही रेल्वे स्थानकांच्या भौगोलिक मर्यादा असल्याकारणाने ते वाढवता येत नाही. मात्र रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचा त्रास कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून सदैव प्रयत्न सुरु आहे.

 जर्जर असलेल्या पुलाची नियमित तपासणी होत नाही का?

अंधेरी रेल्वेस्थानकाजवळील गोखले पादचारी पुलाची मागच्या वर्षी १२ नोव्हेंबरला तपासणी केली गेली. मात्र त्यावेळी धोका असल्याचे निदर्शनास आले नाही. त्यानंतर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी एक चांगला निर्णय घेत संपूर्ण पादचारी पुलांचा पूर्ण तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी एक कमिटीही नेमली आहे. त्यात मुंबई आयआयटीतील तज्ज्ञ, बीएमसी आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही असणार आहेत. त्यामुळे पुलांचा तपास अधिक सखोलपणे होण्यास मदत होणार आहे. मात्र त्यांचा अहवाल किती दिवसांनी येईल याची वाट न बघता आम्ही पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील २९ फूट ओव्हरब्रिज तपास येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण करणार आहोत.

 अंधेरी दुर्घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई होणार का ?

या घटना अतिशय दुर्दैवी असून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी कमिशनर रेल्वे सेफ्टी (सीआरएस) कडे गोखले दुर्घटना प्रकरण सोपविण्यात आले आहे. त्यांची एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. जेव्हा या घटनेतील चौकशीचा अहवाल त्यांच्याकडून आला की दोषी अधिकार्‍यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल.

 पावसामुळे रेल्वे सिग्नल वारंवार खराब का होतात ?

यावर्षी पावसामध्ये सिग्नल यंत्रणेमध्ये वारंवार बिघाड निर्माण झाले. याचे कारण सिग्नल यंत्रणा अत्यंत नाजूक असते. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात लागले की सिग्नल लगेच बंद पडतात. वसई ते विरार दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला तेव्हा सिग्नल बिघडले होते. मात्र पाऊस कमी होताच आम्ही संपूर्ण सिग्नलमधील मशीन बदलल्या. आता संपूर्ण सिग्नललाईन यंत्रणा सुरळीत झालीय.

 पश्चिम रेल्वे सतत तोट्यात येण्यामागचं कारण काय ?

मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे तोट्यात चालते. पश्चिम रेल्वेचे भाडे दरपत्रक बेस्टपेक्षासुद्धा खूप कमी आहे. आम्ही जो भाडेदर लावतो तोच आम्हाला प्रचंड तोट्यात टाकणारा असतो. पश्चिम रेल्वेचा तोटा कमी करायचा असेल तर नेमकं आल्या रेल्वेभाडे दरपत्रकाबाबत विचार करणे गरजेचे आहे. या संबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाला आहे.

लोकल सुरक्षेविषयी पश्चिम रेल्वे किती गंभीर आहे?

पश्चिम रेल्वे सुरु झाली तेव्हापासून आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेविषयी अतिशय गंभीर आहोत. रेल्वे अपघात कमी होण्यासाठी आम्ही सतत आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. त्यातून मानवी तस्करीलाही आळा बसतो. मात्र अनेकदा प्रवाशांकडून रेल्वेच्या नियमांचे पालन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातांची संख्या शून्यावर यावी हाच आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी आम्ही वेळोवेळी रेल्वे कार्यशाळासुद्धा घेतो. सोबतच रेल्वे नियमांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी जनजागृती अभियानसुद्धा राबवले जाते.

लोकलची क्षमता वाढविण्यासाठी काय उपाय करत आहात?

पश्चिम रेल्वेमध्ये कसलीच कमतरता नाही. मात्र लोकलच्या क्षमतेनुसार प्रवासी संख्या खूप जास्त आहे. सोबतच एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड आला तर बाकीच्या लोकल खोळंबतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. पश्चिम रेल्वे लोकल सेवांची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर दिला जात आहे. त्यातून पश्चिम रेल्वेची क्षमता वाढेल आणि मुंबईकरांना आरामदायक प्रवास करणे शक्य होईल. पश्चिम रेल्वेवर सध्या बम्बार्डियर आणि एसी लोकल चालवीत आहे. सध्या लोकलच्या दररोज १,३६५ फेर्‍या सुरु आहेत.

हायकोर्टाने केलेल्या विचारणेनुसार रुळांची उंची वाढणार का?

सखल भागातील रेल्वे रुळांवर उंची वाढवणे खूप कठीण आहे. कारण रेल्वे रुळांची उंची वाढवायची असेल तर आरओबी, एफओबी आणि रेल्वे स्टेशनची उंची वाढवावी लागेल. मात्र या सर्व बाबींसाठी पश्चिम रेल्वे नियोजन करत आहे. लवकरच रेल्वे रुळांवर उंची वाढविण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून काही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -