घरमनोरंजन‘धडक’बाज जोडी जान्हवी कपूर आणि ईशान

‘धडक’बाज जोडी जान्हवी कपूर आणि ईशान

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीत माइलस्टोन ठरलेल्या ‘सैराट’या चित्रपटाचा हिंदीमधील रिमेक असलेला ‘धडक’ चित्रपट येत्या २० तारखेला प्रदर्शित होत आहे. ‘सैराट’ गाजला तो नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन, अजय-अतुल यांचं संगीत आणि रिंकू राजगुरु-आकाश ठोसर यांच्या सहज अभिनयामुळे. ‘धडक’मध्ये रिंकू आणि आकाशची जागा घेतली आहे ती जान्हवी कपूर आणि इशांत खट्टर या जोडीनं. त्यांच्याशी केलेली ही चर्चा.

‘धडक’ची निर्मिती केली आहे ती करण जोहरनं. त्याला आपला सिनेमा कसा ‘प्रमोट’ करावा हे खूपच चांगलं समजतं. म्हणूनच त्यानं ‘लीड पेअर’ असलेल्या जान्हवी कपूर आणि इशांत खट्टरला देशभरातील मीडियाची सफर घडवून आणली. ‘सैराट’सारखा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात आहे, हे माहीत असूनही करण जोहरनं या चित्रपटाचं दणकून ‘प्रमोशन’ केलं. याबद्दल विचारलं असता जान्हवी म्हणते, की ‘धडक’च्या ‘प्रमोशन’चा हा काळ आनंददायी असला तरी नक्कीच शरीराला थकवणारा होता. मुलाखती देण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी फिरलो. आम्हाला भेटण्यासाठी, आमच्याशी बोलण्यासाठी मीडिया इच्छुक होता, ही खूपच आनंददायी गोष्ट. खूप नवीन लोकांना भेटले. कधी कधी वाटतं की आपली बोलण्यात काही चूक तर झालेली नाही ना… ‘मीडिया’चं जान्हवीवर असलेलं दडपण इशांतशी बोलतानाही जाणवलं. त्यानं तर प्रत्यक्ष शूटिंगचा अनुभव मीडियाला सामोरे जाण्यापेक्षा अधिक सोपा असल्याची कबुली दिली. शूटिंगवेळी आमच्यासमोर एकच कॅमेरा असतो, मात्र ‘प्रमोशन’दरम्यान आमच्यावर दोनशे कॅमेरे आणि तेवढेच माईक होते, असाही अनुभव इशांत सांगतो.

- Advertisement -

जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट. तिच्या तुलनेत इशांत थोडा अनुभवी म्हणावा लागेल. त्यानं यापूर्वी २००५ मधील ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात बालकलाकाराचं काम केलं होतं. मोठा झाल्यानंतर त्यानं चित्रपट माध्यमाचा अनुभव येण्यासाठी ‘उडता पंजाब’ आणि ‘हाफ विडो’ या दोन चित्रपटांसाठी सहदिग्दर्शक म्हणून काम केलं. तसेच विख्यात इराणीयन दिग्दर्शक माजीद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातही त्यानं अभिनय केलाय. या दोघांना चित्रपटक्षेत्राची मोठी पार्श्वभूमी असल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. त्याबद्दल जान्हवी म्हणते की, ‘प्रेक्षकांनी आमच्या कुटुंबावर खूप प्रेम केलं आहे, याची मला कल्पना आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज या स्थानी पोचलो आहोत. त्यामुळेच आमच्या कुटुंबाला जे प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तसंच प्रेम वैयक्तिकदृष्ट्या माझ्याही वाट्याला यावं अशी मी अपेक्षा करतेय. अर्थात ही गोष्ट सोपी नाही, याची मला कल्पना आहे. प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी मला खूप काम आणि कष्ट करावे लागणार आहेत. चांगलं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीवदेखील मला आहे. त्यामुळेच आपल्याकडून प्रेक्षकांची निराशा होऊ नये याची मी काळजी घेणार आहे. ‘आपल्या कुटुंबियांच्या ‘लीगसी’बद्दल इशांत थोडं वेगळं मत मांडतो. तो म्हणतो, मी माझा भाऊ शाहिद कपूरलाच माझं आदर्श मानलं. आतापर्यंत त्याचंच मला मार्गदर्शन मिळालं आहे. मात्र कुटुंबियांच्या फिल्मी बॅकग्राऊंडचं दडपण माझ्यावर कधीही नव्हतं.’

 

- Advertisement -

‘सैराट’ चित्रपटानं फक्त मराठी प्रेक्षकांवरच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांवर आपली छाप उमटवली. त्यामुळे त्याचं हिंदीकरण प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरणावर याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जान्हवी आणि इशांत या दोघांनीही ‘धडक’ म्हणजे ‘सैराट’ची जशीच्या तशी नक्कल नसल्याचं आवर्जून स्पष्ट केलं. याबद्दल जान्हवी म्हणते, सैराट हा एक ‘आयकॉनिक’ चित्रपट होता. प्रेक्षकांप्रमाणेच आम्हालाही हा चित्रपट आवडला. मात्र ‘सैराट’च्या कथानकाला आम्ही ‘धडक’मध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीनं सादर केलं आहे. मूळ कथानकातून आणखी एक वेगळा विचार आम्ही मांडला आहे. खूप कष्ट आणि इमानदारीनं आम्ही हा चित्रपट केलाय. आता आमचे हे कष्ट पडद्यावर व्यवस्थित उतरले आहेत की नाही, हे ठरविण्याचं काम प्रेक्षकवर्ग करील. इशांतनं जान्हवीचा मुद्दा आणखी स्पष्ट करीत म्हटलं, ‘सैराट’ जरी पहिल्यांदा मराठीत बनला असला तरी त्याचं कथानक पूर्ण भारतामधील प्रेक्षकांना ‘अपील’ करणारं आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक शशांक खेतान सध्या अशा ‘पोझिशन’मध्ये आहे की, तो आपल्या नवीन चित्रपटासाठी कोणताही विषय निवडू शकला असता. परंतु, त्याला ‘सैराट’चा विषय अधिक आवडला नि त्यानं आपल्या पद्धतीनं तो सादर केला आहे. ‘सैराट’मधील परशा आणि आर्ची आता ‘धडक’मध्ये मधुकर आणि पार्थवी बनले आहेत. मात्र, त्यांचं राहणीमान खूप वेगळं आहे. ‘सैराट’चं कथानक करमाळ्यात घडलं होतं. आमच्या चित्रपटाचं कथानक उदयपूरमध्ये घडलं आहे. ‘सैराट’वरून प्रेरणा घेऊन आमच्या टीमनं ‘धडक’ला एक वेगळी ट्रीटमेंट दिली आहे.

‘धडक’मधील आपल्या भूमिकेबद्दल जान्हवी म्हणते, या चित्रपटात मी ‘पार्थवी’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. एका राजकीय कुटुंबात ती वाढलेली असते. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात अशी अवघड व्यक्तिरेखा साकारताना मला खूप प्रयत्न करावे लागले. या व्यक्तिरेखेच्या तोंडचे संवादांनाही वेगळ्या उच्चारांची जोड होती. परंतु, हे सगळं मी प्रयत्नपूर्वक शिकले. मला मीडियाद्वारे विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न म्हणजे, या चित्रपटानंतर तुझं आयुष्य बदलणार आहे का? खरं सांगू, मलाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. आम्ही खूप मेहनत घेऊन हा चित्रपट केलाय, एवढंच मी सध्या सांगू शकते. आमचा चित्रपट तसेच त्यामधील भूमिका प्रेक्षकांना आवडावी, एवढीच प्रार्थना सध्या मी करीत आहे. ‘धडक’च्या चित्रीकरणाचा अनुभव शेअर करताना इशांत म्हणतो, या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं आम्ही उदयपूर शहरामध्ये जो वेळ घालवला तो खूप मला स्पेशल वाटतो. शूटिंगच्या धावपळीत रोजचा दिवस कधी मावळायचा हे समजायचंच नाही. चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या सत्रामध्ये मला पाण्यामध्ये उडी मारण्याचे दोन सीन्स शूट करावे लागले. ऐन डिसेंबर महिन्यात हे सीन शूट केले गेल्यामुळे माझी त्यावेळी काय अवस्था झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. उदयपूरच्या निर्मनुष्य रस्त्यांवर आम्ही मध्यरात्री शूटिंग केलं. थोडक्यात खूपच चांगला अनुभव होता.

– मंदार जोशी

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेअभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -