घरमुंबईवंचितांचा रंगमचीय आविष्कार राज्यभरात नेणार  

वंचितांचा रंगमचीय आविष्कार राज्यभरात नेणार  

Subscribe

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन

वंचितांचा रंगमंचावर लोकवस्तीतल्या मुली – मुलांनी स्वतःचे आयुष्य, अनुभव व त्यावरील आपले भाष्य यांना मनोविकासाच्या कोंदणात बसवून जो बहारदार नाट्यजल्लोष सादर केला तो अद्वितीय असून, आगामी काळात हा जल्लोष राज्याच्या इतर भागात घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ, ज्येष्ठ नाटककार आयपीएच संस्थेचे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ठाण्यात केले. समता विचार प्रसारक संस्थेने बालनाट्य संस्थेसोबत आणि आयपीएचच्या सहकार्याने सानेगुरुजी स्मृतीदिनानिमित्त सादर केलेल्या मनोविकास वरील नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी डॉ. संजय मंगला गोपाळ होते.

नववीतल्या मुलाच्या दप्तरात पालकांना सापडलेल्या कंडोमच्या पाकिटाच्या निमित्ताने केवळ लैंगिक नव्हे तर भावनिक, वैचारीक व मानसिक आधार देणारे जीवन शिक्षण महत्त्वाचे असल्याचा संदेश देणारी फुगा ही विश्वनाथ चांदोरकर लिखित आणि दिग्दर्शित नाटिका किसन नगराच्या मुलांनी विनोदी पद्धतीने सादर केली. सिद्धेश्वर तलाव – रमाबाई आंबेडकर नगरातील शालेय मुलांनी लहान मुलांच्या खोटं बोलण्याच्या सवयीवर भगवान बुद्धाच्या शिकवणुकीच्या आधारे मार्गदर्शन करणारी नाटिका सादर केली. हर्षदा बोरकर लिखित या नाटिकेस टॅगच्या सुनिता फडके यांचे दिग्दर्शकीय मार्गदर्शन लाभले. तरुणींना नादाला लावत, प्रेमाच्या खोट्या बाया मारणार्‍या मुलांमुळे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून न घेता, मुलींनी स्वयंसिद्ध बनण्याची भूमिका अतिशय सूचक पद्धतीने व उमलत्या गुलाबाचा वापर करत मांडणारी अक्षता दंडवतेने लिहिलेली नाटिका माजिवडा गटाने सादर केली.

- Advertisement -

घरातल्या मुलीला नाटक, वक्तृत्व, नृत्य आदी छंद जोपासू देण्यात धोक्यापेक्षा तिचं जीवन समृद्ध करणं अभिप्रेत आहे. पालकांनी याबाबत धाक दपटशा पेक्षा हळुवारपणे परंतु जागरुकतेने मुलींचा सांभाळ करावा व तिला मुलांप्रमाणे स्वातंत्र्य द्यावे हे सांगणारी अनुजा लोहार या एकलव्य विद्यार्थिनीने लिहिलेल्या व टॅगच्या योगेश खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या नाटिकेतून व्यक्त झाले. घरात हरवलेली वस्तू शोधताना आयुष्यातले एकत्र जगण्याचा आनंद देणारे अनेक हरवलेले क्षण अनपेक्षितरित्या सापडतात, नाती समृद्ध बनतात हा संदेश देणारी इनॉक कोलियार ने बसवलेली लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड ही नाटिका मनोरमा नगरने सादर केली.

भिवंडी मिरॅकल्स या युवा गटाने घरातील स्त्रीची करीयर करताना नवर्‍याच्या संशयाच्या फेर्‍यात कशी घुसमट होते यावर भाष्य करणारी नाटिका सादर करताना, अशावेळी मानसोपचार करणारे समुपदेशन कामी येते हा संदेश प्रभावी पद्धतीने दिला. चेतन दिवेने या नाटिकेच्या लेखन – दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.या कार्यक्रमाला रंगायतन तुडुंब भरले होते. विविध लोकवस्त्यांमधील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी नाट्यजल्लोष मध्ये सामील सर्व कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -