घरमुंबईती परत येणार...! डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येचे दृश्य करणार उभे

ती परत येणार…! डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येचे दृश्य करणार उभे

Subscribe

नायर हास्पिटलमधील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पायलने नेमकी कशा प्रकारे आत्महत्या केली याचा शोध घेण्यासाठी तिच्या आत्महत्येचे दृश्य गुन्हे शाखेकडून उभे करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणातील काही साक्षीदारांचे जबाब पुन्हा एकदा नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आहे. शनिवारी ५ जणांचे नवीन जबाब नोंदवण्यात आले असून यामध्ये पायलच्या युनिटमधील वॉर्ड बॉय, नर्स यांचा समावेश आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास आग्रीपाडा पोलिसांकडून काढून घेऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेला अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी करता आली नाही. तत्पूर्वीच न्यायालयाने तिघींना न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमुळे तपासात अनेक गोष्टी समोर येणे कठीण झाले आहे. पायलने गळफास घेतलेल्या स्कार्फची लांबी, जमिनीपासून छतापर्यंतची उंची मोजण्यात येणार आहे.

- Advertisement -

पायलच्या उंचीचा पुतळा तयार करून आत्महत्येचे दृश्य उभे करण्यात येणार आहे. पायलने आत्महत्या केलेली नसून ही हत्या असल्याचे आरोपही अनेकांकडून करण्यात आले होते. त्यामुळे गुन्हे शाखेकडून पायलने ज्या खोलीत आत्महत्या केली त्याची पाहणी केली आहे. या आत्महत्या दृश्यातून बर्‍याच गोष्टी समोर येतील, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पायलने गळफास घेतल्यानंतर तिचे सहकारी आणि हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी तिला खाली उतरवून तिच्यावर उपचार सुरु केले होते, मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. उपचारावेळी अटक करण्यात आलेल्या तिन्ही डॉक्टर्स उपस्थित होत्या. या प्रकारानंतर तब्बल दोन तासांनी पायलच्या आत्महत्येची सूचना पोलिसांना देण्यात आली होती. या दोन तासांपूर्वी नक्की काय झाले हे तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

या प्रकरणात नायर हॉस्पिटल तसेच पायलची मित्र मंडळी असे सुमारे २० जणांचा जबाब आग्रीपाडा पोलिसांनी नोंदवला आहे. गुन्हे शाखेकडून पुन्हा एकदा त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. शनिवारी गुन्हे शाखेने नायर रुग्नालयातील ५ कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले असून त्यात पायलच्या युनिटमध्ये काम करणारे वॉर्ड बॉय, नर्स आणि आया यांचा समावेश आहे.

पायल तडवी प्रकरण – आयएमएची सत्य शोधक समिती स्थापन

निवासी डॉक्टर डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येचा कसून तपास व्हावा यासाठी आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सत्य शोधक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती डॉ.पायला तडवी यांच्या आत्महत्येची पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या घटकांचं मूल्यमापन करणार आहे.

निवासी डॉक्टरांवर आणि प्रामुख्याने सरकारी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण असतो आणि त्यातून त्यांना नैराश्य येते, पण डॉ. पायलच्या प्रकरणात, जातीय भेदभाव आणि कलंक हे आरोप करण्यात आले आहेत. जर हे खरे असेल तर हा फार गंभीर विषय आहे आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थितीत काम करावे लागते ती स्थिती आणि विशेषतः सरकारी हॉस्पिटलमधील राहण्याची व्यवस्था, त्यांच्यावर नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असं यावेळेस या समितीतील डॉक्टरांनी सांगितलं.

आयएमएची सत्यशोधक समिती एका आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करणार आहे. या सत्यशोधक समितीमध्ये अशोक आढाव आणि डॉ. रवी वानखेडकर (आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. चंद्रकांत म्हस्के (डीन जीएमसी-नांदेड). डॉ. होजी कपाडिया (आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मुंबई), डॉ सुहास पिंगळे (आयएमए महाराष्ट्र राज्य सचिव) यांचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीत ‘उपचारात्मक उपाययोजना’(रेमेडियल मेझर्स) विचारात घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -