घरमुंबईहक्काच्या सुट्ट्यांवर पावसाचे पाणी

हक्काच्या सुट्ट्यांवर पावसाचे पाणी

Subscribe

पावसामुळे मिळालेल्या या सुट्टीमुळे आगामी महत्त्वाच्या सुट्टीवर पाणी सोडावे लागणार आहे. या सुट्ट्यांमुळे मुख्याध्यापकांना त्यांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली असून शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षाला आवश्यक तासिकांचा नियम पूर्ण करायचा कसा? हा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे या सुट्ट्या भरून काढण्यासाठी आता आगामी दिवसात सुट्ट्या कमी करुन अतिरिक्त तासांचे आयोजन करण्याची तयारी सुरु केली आहे.

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसामुळे मिळालेल्या या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सध्या अनेक जण सुट्टीचा आनंद घेत पावसात भिजत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर पालक वर्गही या सुट्टीचा आनंद लुटत आहेत. मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या या आनंदावर लवकरच विरजण पडणार आहे. पावसामुळे मिळालेल्या या सुट्टीमुळे आगामी महत्त्वाच्या सुट्टीवर पाणी सोडावे लागणार आहे. या सुट्ट्यांमुळे मुख्याध्यापकांना त्यांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली असून शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षाला आवश्यक तासिकांचा नियम पूर्ण करायचा कसा? हा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे या सुट्ट्या भरून काढण्यासाठी आता आगामी दिवसात सुट्ट्या कमी करुन अतिरिक्त तासांचे आयोजन करण्याची तयारी सुरु केली आहे.

हाफ डे आणि दिवाळीची सुट्टी कमी होणार

मुंबईसह आसपासच्या परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे दोन दिवस मुंबईतील शाळांना सुट्टी देण्याची वेळ आली. सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टी जाहीर केल्यानंतर मंगळवारी मुख्याध्यापकांनीच त्यांच्या अखत्यारित अधिकार लक्षात घेत सुट्टी जाहीर केली. पावसामुळे जाहीर झालेल्या या सुट्टीमुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच विद्यार्थी आणि पालक वर्ग या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. मात्र विद्यार्थ्यांचा हा आनंद आता फार काळ टिकणार नसून पावसामुळे मिळालेल्या या अतिरिक्त सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापकांची दमछाक होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील शैक्षणिक वर्षात प्राथमिकसाठी २०० आणि माध्यमिक शाळांसाठी २२० दिवसांचा नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दिलेली सुट्टी आणि आता पावसामुळे द्यावी लागलेली सुट्टी यांचे नियोजन करण्यासाठी अनेक शाळांना यापुढे शनिवारी देण्यात येणारा ‘हाफ डे’ आणि गणपतीत किंवा दिवाळीत द्यावी लागणारी सुट्टी कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहेत.

- Advertisement -

परीक्षांना सुट्ट्यांचा फटका बसण्याची भीती

दरम्यान, अनेक शाळांमध्ये सत्र परीक्षा येऊन ठेपली असून या सुट्ट्यांचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा कसा असा प्रश्न आमच्यासमोर असल्याची माहिती मुंबईतील अनेक शाळांतील शिक्षकांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. साधारणत: नियमानुसार ७६ सुट्ट्या देणे बंधनकारक आहेत. मात्र सध्या दिल्या जाणार्‍या एकूण सुट्ट्या लक्षात घेता हा आकडा ८८च्या घरात जात आहेत. त्यात आता या पावसाळी सुट्ट्यांची भर पडल्याने मुख्याध्यापकांची दमछाक होणार हे मात्र नक्की.

शाळांना दिल्या जाणार्‍या सुट्ट्या

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी राष्ट्रीय आणि बँक हॉलिडे सुट्ट्यांसह एकूण ७६ सुट्ट्या देणे बंधनकरक आहे.

- Advertisement -

उन्हाळी सुट्टी – ३८ दिवस
गणपती सुट्टी – ५ दिवस
दिवाळी सुट्टी – १४ दिवस
ख्रिसमस सुट्टी- 7 दिवस
बंधनकारक सुट्टी – २4 दिवस

शिक्षण हक्क कायदा काय सांगतो

शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील प्राथमिक शाळांसाठी वर्षात २०० दिवस आणि माध्यमिक शाळांसाठी २३० कामांचे दिवस होणे बंधनकारक आहेत. तर अनेक शाळा प्रामुख्याने इंग्रजी कॉन्व्हेंट शाळा तासिकांचा नियम पाळतात. या नियमानुसार प्राथमिक ८०० तास आणि माध्यमिक शाळा १ हजार तासांचे नियोजन करुन शाळा भरवितात. अनेक शाळा या तास निहाय शाळांचे वेळापत्रक आखून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी देतात.

मुंबईत पावसामुळे जी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टी भरुन काढण्याचे प्रमुख आवाहन आता आमच्यासमोर असणार आहे. या सुट्टी भरुन काढण्यासाठी अतिरिक्त तास किंवा दिवाळी आणि इतर सुट्यां कमी कराव्या लागणार आहेत. प्रत्येक शाळा त्यांच्या सोयीनुसार याचे नियोजन करणार आहेत.
– प्रशांत रेडीज, सचिव, मुख्याध्यापक संघ महामंडळ

शाळांना सुट्टी जाहीर केली असली तरी ऐनवेळी निर्णय जाहीर केल्याने पालकांची दमछाक होतेय. त्यामुळे शाळेबरोबरच पालकांची ही दमछाक होतोय. लवकरच शाळांमध्ये सत्र परीक्षा होणार आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नक्कीच धावपळ करावी लागणार असून त्याचा फटका विद्यार्थी पालकांना बसणार आहेत. त्यामुळे आता शाळा आगामी काळात सुट्ट्या आणि हाफ डे कमी करणार असल्याने त्याचे नियोजन करताना पालकांचे नियोजन कोलमडणार आहे. हे नक्की. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.
– अरुंधती चव्हाण, अध्यक्षा, पालक शिक्षक संघटना,


सौरभ शर्मा, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -