घरमुंबईवैद्यकीय नियमांना ई-फार्मसीकडून फाटा

वैद्यकीय नियमांना ई-फार्मसीकडून फाटा

Subscribe

औषध विक्रीसाठी फोनवर होते रुग्णांची तपासणी

औषध खरेदीसाठी प्रिस्क्रिप्शन बंधनकारक आहे. ऑनलाईन फार्मसी कंपन्यांनी औषधे खरेदी करताना प्रिस्क्रिप्शन नसल्यास डॉक्टरांकडून फोनवर रुग्णांची तपासणी करण्याची तरतूद केली आहे. मात्र फोनवरून तपासणी करणारी समोरील व्यक्ती कॉल सेंटरमधील व्यक्तीप्रमाणे फक्त रुग्णाचे नाव व तुम्ही हे औषध मागवले आहेत का? असे प्रश्न विचारून प्रिस्क्रिप्शन तयार करत आहे. औषध मागवणार्‍या व्यक्तीला नेमके काय झाले आहे, कशासाठी ती व्यक्ती औषध मागवत आहे, ती खरोखरच आजारी आहे का? याची कोणतीही तपासणी न करता ऑनलाईन फार्मसीच्या कंपन्यांकडून औषधे पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन मागवण्यात येणार्‍या औषधांचा गैरवापर होण्याचा प्रकार भविष्यात सर्रास होऊ शकतो. तसेच यामुळे रुग्णांच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.

रुग्णांची वैयक्तिकरित्या तपासणी केल्याशिवाय त्याला फोनवरून औषधे सांगण्यास डॉक्टरांना मनाई करण्याबरोबरच प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णांना औषधांची विक्री करण्यावर केमिस्टंना सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. परंतु, ऑनलाईन औषधे खरेदी करताना या नियमाला ऑनलाईन फार्मसी कंपन्यांकडून बगल देण्यात आली आहे. ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्याच्या वेबसाईटवर औषधाचे नाव नमूद केल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडे प्रिस्क्रिप्शनची मागणी करण्यात येते. परंतु, तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन नसल्यास मोफत डॉक्टरांच्या सल्लाबाबत विचारणा करण्यात येते.

- Advertisement -

हा डॉक्टर दोन ते तीन तासांत तुम्हाला फोन करेल असा संदेश तुमच्या मोबाईलवर येतो. त्यानुसार कंपनीच्या डॉक्टरकडून फोन आल्यानंतर ती व्यक्ती रुग्णाला तुमचे नाव काय आहे? तुम्ही अमूक औषध मागवले आहेे का? असे दोन ते तीन प्रश्न विचारून फोन बंद करते आणि थोड्या वेळातच तुमच्या मोबाईलवर त्या डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन येते. मुळात ती व्यक्ती कशासाठी औषध मागवत आहे. किती दिवसांपासून ते औषध घेत आहे. त्या व्यक्तीचा रक्तदाब किती आहे. त्या व्यक्तीला खरेच या औषधाची गरज आहे का? त्या व्यक्तीने मागवलेले औषध हे त्याच्यासाठी योग्य आहे का? त्याला कोणत्या प्रकारची अ‍ॅलर्जी आहे का? ती व्यक्ती आणखी कोणते औषधे घेत आहे का?, त्या व्यक्तीने नमूद केलेले औषध त्यांना कोणी घेण्यास सांगितले अशी कोणतीही विचारणा न करता त्याला औषधाचे प्रिस्क्रिप्शन त्याला देण्यात येते.

प्रत्यक्षात रुग्ण समोर असल्याशिवाय डॉक्टरांनी औषधे लिहून देऊ नयेत असे असतानाही ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्या सर्रास रुग्णांना फोनवरून प्रिस्क्रिप्शन देत आहेत. फोनवरून रुग्णांची माहिती घेणे व त्यांना प्रिस्क्रिप्शन देत ऑनलाईन कंपन्या रूग्णांच्या जीवशी खेळ करण्याबरोबरच औषधांचा गैरवापर होण्याच्या प्रकारास खतपाणी घालत आहे. ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्यांच्या डॉक्टरांचे रुग्णांना येणारे सर्व फोन हे बंगलोरवरून येत आहेत. त्यामुळे रुग्णांना फोन करणारी व्यक्ती ही डॉक्टरच आहे का? हा फोन कॉल सेंटरमधील एखाद्या व्यक्तीकडून येत आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

- Advertisement -

रुग्णाची तपासणी केल्याशिवाय फोनवरून औषधे देता येत नाहीत. व्यक्तीचा आजार, त्याला असलेली अ‍ॅलर्जी, रक्तदाब व अन्य चाचण्या व तपासण्या केल्याशिवाय औषधे देता येत नाही. रुग्णाला प्रत्यक्षात तपासल्याशिवाय फोनवरून औषध दिल्यास रुग्णाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे.
– डॉ. कामाक्षी भाटे, प्राध्यापक, केईएम हॉस्पिटल

ई- फार्मसी कंपन्यांमार्फत औषधे मागवताना प्रिस्क्रिप्शन नसलेल्या रुग्णाला कंपनीच्या डॉक्टरांकडून फोन येतो. परंतु, हे डॉक्टर रुग्णाला कोणतीही माहिती न विचारता त्याला प्रिस्क्रिप्शन देतात. अशाप्रकारे प्रिस्क्रिप्शन देणे हे घातक आहे. डॉक्टरांनी फोनवरून प्रिस्क्रिप्शन देऊन ऑनलाईन मागवलेल्या औषधांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन औषधांच्या विक्रीवर बंदी घालावी.
– अभय पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फेडरेशन

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -