घरमुंबईनिष्ठावंतांना डावलले म्हणून मतदानातून काढता पाय

निष्ठावंतांना डावलले म्हणून मतदानातून काढता पाय

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या निष्ठावंतांना डावलून आयत्या क्षणी राष्ट्रवादीतून आयात करण्यात आलेल्याला परिवहन सभापतीची उमेदवारी दिल्याने मतदान प्रक्रियेतून पाय काढला,असे परखड मत परिवहन सदस्य राजकुमार सिंग यांनी व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे आपण मतदानात भाग घेतला नसल्याने भाजप आणि महाविकास आघाडी यांचे समान संख्याबळ झाल्यावर काढण्यात आलेल्या चिठ्ठीनेही भाजपला साथ दिली नाही. ही निष्ठावंतांसोबत विश्वासघात केल्याची शिक्षा आहे,असा गौप्यस्पोट परिवहन सदस्य आणि भाजपचे मंडळ अध्यक्ष राजकुमार सिंग यांनी केला आहे.

महानगरपालिका परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मतदान न करता पाय काढून पळ काढणारे राजकुमार सिंग यांच्यावर पक्ष कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले असतानाच,मतदानातून पाय का काढला याविषयी राजकुमार यांनी भाजपा पक्ष श्रेष्ठींकडे मन मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या 28 वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असून मंडळ अध्यक्ष पदाची जबाबदारी हाताळत आहे. परिवहन सभापती साठी उमेदवारी मिळावी अशी विनंती पक्षाकडे केली होती.मात्र राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करणार्‍या शंकर दावानी यांना उमेदवारी देण्यात आली.त्यास विरोध केला. माझ्याऐवजी परिवहनमध्ये सदस्य असलेले मनोहर खेमचंदानी, बच्चन तोमर यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली असती तर विरोध केला नसता, पण आयात उमेदवार शंकर दावानी यांना उमेदवारी दिल्याने मतदानाच्या प्रक्रियेतून पाय काढला असे राजकुमार यांनी सांगितले.

- Advertisement -

21 डिसेंबर रोजी उल्हासनगर महानगरपालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक संपन्न झाली.त्यापूर्वी भाजप 3 आणि भाजपत विलीन झालेल्या साईपक्षाचे 2 मिळून 5 स्थायी स्थायी समिती सभापतीचे 1 मत मिळून संख्याबळ 6 होत होते. याविरूध्द महाविकास आघाडीतील टीओके,शिवसेना,राष्ट्रवादीआणि रिपाइगट मिळून 7 मते होत होती.मात्र परिवहन सभापतीसाठी राष्ट्रवादीचे शंकर दावानी यांनी भाजपत प्रवेश केल्यावर त्यांना उमेदवारी देण्यात आली. दावानी आल्याने भाजपा 6 आणि महाविकास आघाडी 6 असे समान संख्याबळ झाले.स्थायी समिती सभापतीचे निर्णायक मत हे भाजपचेच असल्याने दावानी यांचा विजय हमखास होता.मात्र दावानी यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले राजकुमार सिंग यांनी पालिकेतील मतदान प्रक्रियेत भाग न घेता, टाऊन हॉलच्या मीटिंगमधूनच पाय काढल्याने भाजपचे शंकर दावानी आणि टीम ओमी कालानीचे दिनेश लहरानी यांना प्रत्येकी 6 मते पडल्याने सामना टाय झाला. त्यात जी निर्णायक चिठ्ठी काढण्यात आली त्यात दिनेश लहरानी यांचे नाव निघाल्याने भाजपचा पराभव झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -