घरमहाराष्ट्रशेतकर्‍यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे

शेतकर्‍यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे

Subscribe

कर्जतच्या ८० टक्के शेतकर्‍यांना प्रतीक्षा

शासनाने 27 नोव्हेंबर 2019 रोजी पावसाळ्यातील भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला हप्ता म्हणून 1 हजार 612 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत नुकसानग्रस्त असलेल्या आणि शेतीचे पंचनामे झालेल्या 8 हजार 432 शेतकर्‍यांना म्हणजे ८० टक्के शेतकर्‍यांना शासनाची मदत मिळाली नाही. 27 नोव्हेंबर रोजी राज्यात सरकार स्थापन नव्हते आणि त्यावेळी शेतकर्‍यांना मदत झाली, पण सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कर्जत तालुक्यातील 2 हजार 942 हेक्टर जमिनीवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात 10 हजार 46 शेतकर्‍यांच्या शेतातील भात, नागली, वरी पिकाच्या नुकसानीचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भातशेतीचे नुकसान सरत्या पावसाने केले होते. त्या नुकसानीबद्दल शासनाने हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यावेळी केलेल्या पंचनाम्यांनुसार 10 हजार 46 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात 27 नोव्हेंबर 2019 रोजी मदत देण्यात आली होती. त्यावेळी 1 हजार 612 शेतकर्‍यांना नुकसानीची 57 लाख 10 हजार 313 इतकी रक्कम बँक खात्यात जमा केली होती. मदत पोहचली नसलेल्या उर्वरित 8 हजार 432 नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी आवश्यक असलेली 2 कोटी रकमेची मागणी कर्जत तहसील कार्यालयाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांना शासनाने हेक्टरी 8 हजार रुपयांचे अनुदान मदती निधी देण्याचे निश्चित केले आहे. ज्यावेळी शासनाने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली, त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ती मदत जाहीर केली होती. पण ती मदत अपुरी असल्याची भावना सर्व शेतकर्‍यांनी व्यक्त केली होती. परंतु नवीन सरकार सत्तेवर आल्यावर त्यात वाढ होईल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. पण 80 टक्के शेतकर्‍यांना हेक्टरी 8 हजार प्रमाणे जाहीर झालेली नुकसान भरपाईची शासकीय मदत अद्याप पोहचली नाही.

27 नोव्हेंबरनंतर नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता प्राप्त होताच इतर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, असे तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र 25 दिवसांचा कालावधी लोटला तरी शासनाची मदत काही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. यामुळे संकटात असलेला बळीराजा आणखी संकटात आला आहे. 8 हजार 832 शेतकरी आता कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन मदत बँक खात्यात जमा झाली का, अशी विचारणा करीत आहेत.

- Advertisement -

पंचनामे झालेल्या सर्व शेतकर्‍यांचे आधार कार्ड, बँक विवरण आणि सातबारा उतारा याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. मदत प्राप्त झाल्यानंतर काही तासात तात्काळ ती मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकेल, असे नियोजन केले आहे.
-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -