घरमुंबईशिवसेनेकडून पारनेरचा कल्याण, अंबरनाथमध्ये वचपा !

शिवसेनेकडून पारनेरचा कल्याण, अंबरनाथमध्ये वचपा !

Subscribe

पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी

पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत आणल्याचा वचपा शिवसेनेने रविवारी कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी करून काढला आहे. त्यामुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीला सभापती आणि उपसभापतीपदावर पाणी सोडावे लागले आहे. तर अंबरनाथमध्येही शिवसेनेने स्वत:कडे सभापतीपद ठेवताना उपसभापतीपद भाजपला दिले आहे.

कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीची 3 असे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते. मात्र रविवारी सकाळी अचानक मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांचे अकस्मात सूर जुळले. राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. वास्तविक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेचे सभापती व उपसभापतीपदाचे उमेदवार रविवारी अर्ज मागे घेणार होते. मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी कल्याण बाजार समिती राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव पूर्णपणे उधळून लावला.

- Advertisement -

रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता दशरथ वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली तर, शिवसेनेचे रमेश बांगर उपसभापतीपदी विराजमान झाले. हात उंचावून झालेल्या मतदानामध्ये शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांना ७ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना ५ मते मिळाल्याने शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या सभापतीपदी विराजमान झाल्या. उपसभापतीपदी शिवसेनेचे रमेश बांगर यांना ७ मते मिळाली, तर राष्ट्रवादीसोबत गेलेले शिवसेनेचे भरत भोईर यांना ५ मते मिळाल्याने उपसभापतीपदाची माळ शिवसेनेच्या रमेश बांगर यांच्या गळ्यात पडल्याने कल्याण पंचायत समितीवर भगवा फडकला आहे.

अंबरनाथमध्ये उपसभापतीपद भाजपला
अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेने राष्ट्रवादीला उपसभापतीपद देण्याचे आधी कबूल केले होते. मात्र पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत आणल्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या सदस्याला उपसभापतीपदी विराजमान केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -