घरमुंबईआयटीआयमधील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी होणार सुलभ

आयटीआयमधील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी होणार सुलभ

Subscribe

नावनोंदणी, समुपदेशन, मुल्यमापन चाचणी एकाच छताखाली

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मार्गदर्शन केंद्रामध्ये माराव्या लागणार्‍या फेर्‍यांपासून आता सुटका होणार आहे. त्याचप्रमाणे मार्गदर्शन केंद्रामध्ये नाव नोंदणी करणे, समुपदेशन, मूल्यमापान चाचणी आदी सुविधा विद्यार्थ्यांना आयटीआयमध्येच उपलब्ध होणार आहेत.

आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये नाव नोंदणी करावी लागते. नावनोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यवसाय समुपदेशन करणे, मूल्यमापन चाचणी करणे त्याचबरोबरच रोजगार मेळावे यांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये वारंवार फेर्‍या माराव्या लागतात. हे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अनेक ठिकाणी आयटीआयच्या संस्थेपासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना नाहक प्रवास व आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यातच राज्यातील बहुतांश जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ही भाड्याच्या जागेत असल्याने सरकारला भाड्यापोटी मोठी रक्कम मोजावी लागते.

- Advertisement -

त्यामुळे सरकारलाही आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यातील सर्व मार्गदर्शक केंद्र सरकारी आयटीआय व सरकारी तांत्रिक विद्यालयांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला. त्यानुसार 1 जानेवारीपासून राज्यातील 13 पैकी 11 मार्गदर्शक केंद्र सरकारी आयटीआय व सरकारी तांत्रिक विद्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला भाड्यापोटी द्यावी लागणार्‍या रक्कमेची बचत झाली. मार्गदर्शन केंद्रातील व्यवसाय समुपदेशन केद्रात विद्यार्थ्यांचे वेळोवेळी सुमपदेशन करणे आयटीआय संस्थांना शक्य होणार आहे. या केंद्रांमध्ये उमेदवारांना स्वत:ची मूल्यमापन चाचणी करून घेण्याबरोबरच त्यांच्या सोईनुसार केंद्रास भेटही देता येणार आहे. त्याचबरोबर केंद्रामार्फत भरवण्यात येणार्‍या रोजगार मेळावे, शिकाऊ उमेदवारी कायद्यांतर्गत मेळाव्यांमध्ये त्यांना सहज सहभाग घेता येईल. त्यामुळे रोजगार मेळाव्यात उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने रोजगार मिळणे सुलभ होणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.

स्थलांतरित करण्यात आलेली केंद्र
मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, जळगाव, लातूर, परभणी, अमरावती, यवतमाळ या 11 जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आयटीआयव शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या भाड्यापोटी द्यावे लागणारे पैसे वाचवणे आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध होऊन त्यांना रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी हा निर्णय घेतला.
– दीपेंद्रसिंह कुशवाह, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -