मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन, धरणांमध्ये जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा, मोडकसागर व भातसा या धरण परिसरात गेल्या दहा वर्षात झाला नसेल इतका पाऊस झाला असून गेल्यावर्षी सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

मुंबई (mumbai) महानगरासाठी पाणी (water) पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा (tansa), मोडकसागर (modaksagar) व भातसा धरणात (bhatsa dam)पुरेसा पाणी साठा असल्याने तूर्तास पाणी कपातीची (water cut)  शक्यता दिसत नाही. यंदा पाऊस (rain) लवकरच सुरू होणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी बेभरवशाच्या पावसाचे काहीही सांगता येत नाही. त्यामुळे पाऊस लांबला तरी जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी साठा या धरणांमध्ये आहे. त्यामुळे मुंबईकरांना जून अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही.
गेल्या वर्षी सर्वाधिक पाऊस
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा, मोडकसागर व भातसा या धरण परिसरात गेल्या दहा वर्षात झाला नसेल इतका पाऊस झाला असून गेल्या वर्षी सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तानसा, मोडकसागर व भातसा धरण परिसरात अनुक्रमे तीन हजार ३०१, तीन हजार ७२८ आणि तीन हजार २८२ इतका पाऊस झाला आहे. या तीनही धरणात जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन
तानसा धरणाची पाणी साठवणूक क्षमता १८४. ६० दलघमी (दशलक्ष घनमीटर) असून आजमितीस  ५४.९२ दलघमी (३० टक्के) इतका पाणी साठा आहे. गेल्यावर्षी या तारखेला (३२.९३ टक्के) साठा होता. रखरखीत उन्हामुळे या धरणातून आतापर्यंत चार हजार ८१३ दशलक्ष लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. मोडकसागर धरणात २०५.८५ दलघमी इतका एकूण पाणीसाठा असून सध्या ७०.२७ दलघमी. (३४ टक्के ) इतका पाणी साठा आहे. गेल्यावर्षी या तारखेला (५५ टक्के) साठा होता. या धरणातून आतापर्यंत पाच हजार ६०० दशलक्ष लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.
भातसा धरणातही मुबलक पाणी
या दोन्ही धरणातून किमान एक हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जादा पाणी सोडण्यात येत असल्याने तानसा व मोडकसागर धरणात पाणी साठा कमी दिसत असून मुंबईला जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो, असा अंदाज तानसा येथील दुय्यम अभियंता दिनेश उमवणे यांनी व्यक्त केला. मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातही मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. या धरणाची एकूण पाणी साठवणू क्षमता ४०५.१८५ दलघमी  असून सध्या ३७१.१८५ दलघमी (३९.३९ टक्के)  इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या तारखेला ३७.५० टक्के साठा होता.