घरमुंबईनवलकर प्रेक्षक गॅलरीसाठी २० रुपये फी; मुंबई पाहाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

नवलकर प्रेक्षक गॅलरीसाठी २० रुपये फी; मुंबई पाहाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

Subscribe

मलबार हिलवरच्या नवलकर गॅलरीसाठी आता प्रौढांना २० रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत.

जोगेश्वरीतील शिल्पग्राममध्ये येणार्‍या पर्यटकांना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मलबार टेकडीवर उभारण्यात आलेल्या प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्याचे या प्रेक्षक गॅलरीचे लोकार्पण झाल्यानंतर या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. यासाठी १६ वर्षांपुढील सर्वांनाच २० रुपये तर परदेशी पर्यटकांना ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, त्या खालील मुलांना नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे मुलांसाठी या ठिकाणी प्रवेश मोफत असेल, परंतु प्रौढांना पैसे देऊनही प्रेक्षक गॅलरीतून मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.

गॅलरीसाठी १० कोटींचा खर्च

मलबार हिल येथील प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीचे लोकार्पण १० ऑक्टोबर २०१८ रोजी शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले होते. कमला नेहरू उद्यानालगत असलेली मुंबई व्ह्युविंग गॅलेरी हे दक्षिण मुंबईमधील सर्वात उंच ठिकाण आहे. या गॅलरीचे नामकरण प्रमोद नवलकर व्ह्युविंग गॅलरी असे करत जनतेसाठी खुले करण्यात आले होते. यासाठी महापालिकेच्या वतीने १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे यासाठी केलेला खर्च, त्यांची देखभाल आणि लोकांची होत असलेली गर्दी आदींच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडत असल्याने महापालिकेने या प्रेक्षक गॅलरीसाठी प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शाळकरी मुलांना वगळता १६ वर्षांवरील प्रत्येकासाठी २० रुपये एवढे प्रवेश शुल्क जलअभियंता विभागाने निश्चित केले आहे. डी विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘ही प्रेक्षक गॅलरी जलअभियंता विभागाच्या अखत्यारीत येत आहे. यासाठी शुल्क आकारण्याचे प्रस्तवित होते. परंतु, प्रवेश शुल्क निश्चित करण्याचे काम जलअभियंता विभागामार्फत केले जाणार होते. जलअभियंता आणि उपायुक्त अशोक तवाडिया यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार असून मान्यतेसाठी विधी समितीपुढे सादर करण्यात आला आहे. समित्यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रवेश शुल्क आकारला जाईल’, असे स्पष्ट केले.

- Advertisement -

समुद्र सपाटीपासून ५४ मीटर उंचीवर मनोरा

मलबार हिल येथील कमला नेहरु उद्यान आणि हँगिंग गार्डन अर्थात तरंगते उद्यान या प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय उद्यानाशेजारीच ही प्रेक्षक गॅलरी आहेत. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ५४ मीटर एवढी आहे. या वास्तूचे चार मजले असून पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक मलबार हिल नियंत्रण कक्ष, दुसर्‍या मजल्यावर दर्शनीय मनोरा आणि तिसर्‍या मजल्यावर दुर्बिणीतून पाहण्यासाठी मनोरा उभारला आहे.

दरदिवशी १५०० पर्यटकांची भेट

या प्रेक्षक गॅलरीतून गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह आणि अरबी समुद्राचे निसर्गरम्य सौंदर्य पाहाता येते. या ठिकाणी देशी आणि परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी प्रत्येक दिवशी सरासरी १५०० पर्यटक तर इतर दिवशी सरासरी १००० पर्यटक भेट देत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -