घरक्रीडाज्येष्ठ कसोटीपटू बापू नाडकर्णींचं निधन, मुख्यमंत्र्यांची भावनिक प्रतिक्रिया!

ज्येष्ठ कसोटीपटू बापू नाडकर्णींचं निधन, मुख्यमंत्र्यांची भावनिक प्रतिक्रिया!

Subscribe

भारताचे एकेकाळचे अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच मुंबईत निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईतल्याच पवई परिसरामधल्या हिरानंदानी गार्डनमध्ये ते राहात होते. या ठिकाणी त्यांची मुलगी राहात असून तिच्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रुपाने भारतीय आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासाचा साक्षीदार हरपल्याची भावना त्यांच्या समकालीन क्रिकेटपटू, त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्या आप्तस्वकीयांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. ४१ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणारे बापू नाडकर्णी हे त्यांच्या टिच्चून माऱ्यासाठी ओळखले जायचे.

बापू नाडकर्णी गेले. भारतीय क्रिकेटचे एक युग संपले. अचूक मारा करणारा गोलंदाज अशी त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटचे स्नेही होते. अनेकदा ते ‘मातोश्री’वर येत. गप्पांची मैफल जमत असे. बाळासाहेबांबरोबर रेल्वे प्रवास करणारी जी टीम होती, त्यात बापू होते. देश बापूंच्या दिलदार खेळीचे सदैव स्मरण ठेवेल. बापूंना माझा मानाचा मुजरा!

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नाडकर्णी यांनी १९५०-५१ च्या मोसमात रोहिंटन बारिया चषकात पुणे युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधीत्व करत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पुढील वर्षीच त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून पदार्पण केले. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईकडून १९१ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी १४ शतकांच्या मदतीने ८८८० धावा केल्या. तर गोलंदाजीत ५०० गडी बाद केले. त्यांना डिसेंबर १९५५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यांनी पहिल्याच डावात नाबाद ६८ धावांची खेळी केली.

- Advertisement -

१९६३-६४ च्या मोसमातील चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे झालेला इंग्लंडविरुद्धचा सामना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम मानला जातो. त्यांनी ब्रायन बोलस आणि केन बॅरिंग्टन यांसारख्या फलंदाजांविरुद्ध टिच्चून मारा करत ३२ षटकांपैकी २७ षटके निर्धाव टाकताना केवळ ५ धावा खर्ची केल्या. तसेच या मालिकेच्या अखेरच्या सामन्यात त्यांनी नाबाद ५२ आणि नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्यांनी भारताकडून ४१ कसोटी सामन्यांत १४१४ धावा केल्या, तर ८८ गडी बाद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -