घरमुंबईखर्‍या पोलिसांकडून तोतया पोलीस गजाआड

खर्‍या पोलिसांकडून तोतया पोलीस गजाआड

Subscribe

बनावट पोलिसांकडून लायटरचे पिस्तूलही ताब्यात

पोलिसांचे गणवेश घालून लायटरसारख्या पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडणूक करण्याचे प्रसंग हिंदी चित्रपटात अनेकदा पहायला मिळतात. अशाच फिल्मी पद्धतीने व्यावसायिकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणार्‍या बनावट पोलिसांना खर्‍याखुर्‍या पोलिसांनी गजाआड केले.

एका व्यावसायिकाला धमकावीत त्याच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा खंडणीखोरांना सोमवारी रात्री ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक करून बेड्या ठोकल्या. परेश पाटील,अभिजीत उतेकर, धनाजी दळवी आणि समीर वाडवेली अशी अटक केलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लायटर असलेले बनावट पिस्तूल, दोन बेड्या, पोलिसांचा गणवेश जप्त केला आहे.

- Advertisement -

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका खाद्यपदार्थाच्या दुकानातून परेश पाटील याने मोमोज खरेदी केले. मात्र, काही वेळेनंतर मोमोजमध्ये स्टेपलरची पिन आढळून आल्याची तक्रार घेऊन परेशसह चौघे जण पोलिसांच्या गणवेशात दुकानात शिरले. त्यांनी स्टेपलरची पिन आढळल्याचा जाब विचारीत दुकानातील एका नोकराला बेड्या घालून धमकावत गुन्हा दाखल करू नये यासाठी व्यापार्‍याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, दुकानातील एका नोकराला या पोलिसांवर संशय आला. त्याने त्याच्याशी परिचित नौपाडा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्‍याशी संपर्क साधला. त्याला हा प्रकार सांगितला.

काही वेळातच नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या बनावट पोलिसांचे बिंग फुटले. खर्‍या पोलिसांनी या चार बोगस पोलिसांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गणवेशात आतापर्यंत कोणा कोणाकडे खंडणी मागितली याचा पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -