घरमुंबईमुंबईतून फिल्मसिटी नेण्याचा डाव नाही योगी आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण

मुंबईतून फिल्मसिटी नेण्याचा डाव नाही योगी आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण

Subscribe

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फिल्मसिटीचा ड्रीम प्रोजेक्ट उभा राहत आहे. या प्रोजेक्टला चालना देण्यासाठी योगी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात पळवू पाहत आहेत, असा आरोप त्यांच्यावर मविआतील नेत्यांकडून होत आहे. त्याला उत्तर देताना मुंबई ही मुंबईच आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तर उत्तर प्रदेश ही भारताची धार्मिक राजधानी आहे. आम्ही उत्तर प्रदेशात स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत. मुंबईमधून फिल्मसिटी नेण्याचा आमचा कोणताही डाव किंवा विचार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

लखनऊ येथे १० ते १२ जानेवारी या काळात होणार्‍या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईचा २ दिवसीय दौरा करीत आहेत. या दौर्‍याच्या पहिल्या दिवशी योगींनी गुरुवारी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली. यानंतर मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, गुंतवणूकदारांसोबतही चर्चा केली.

- Advertisement -

या भेटीत योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेऊन त्याच्यासोबत फिल्मसिटीवर चर्चा केल्याचे म्हटले जात आहे, तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुंबई ही देशाची अर्थभूमी आहे आणि उत्तर प्रदेश ही धर्मभूमी आहे. या दोन्हींचा चांगला संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी आम्ही घेऊन जाणार नसून आमची स्वतःची वेगळी फिल्मसिटी तयार करीत आहोत. उत्तर प्रदेशात १२०० एकर जागेवर फिल्मसिटी तयार होत आहे. चित्रीकरणासाठी जगभरातील सर्वोत्तम सोयीसुविधा या फिल्मसिटीत असतील, असेही आदित्यनाथ यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, आता उत्तर प्रदेशात ९ विमानतळे कार्यरत असून १० विमानतळांवर काम सुरू आहे. त्यातील ५ विमानतळांचे काम पूर्ण झाले आहे. आझमगड, चित्रकूट, सोनभद्र, अलिगड, मुरादाबाद, सहारणपूर, श्रावस्ती येथे विमानतळांचे काम सुरू आहे. आशियातील सर्वात मोठे विमानतळ जेवरमध्ये होत आहे, अशी
माहितीदेखील योगींनी दिली.

- Advertisement -

अयोध्येत महाराष्ट्र भवन
राजभवन येथे झालेल्या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्याला योगी आदित्यनाथ यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी योगींना पायघड्या
मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करणे हे भाजपचे षड्यंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशार्‍यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करीत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -