घरसंपादकीयओपेडश्रद्धा-अंधश्रद्धेतील धूसर रेषा स्पष्ट होण्याचा विवेक हवा!

श्रद्धा-अंधश्रद्धेतील धूसर रेषा स्पष्ट होण्याचा विवेक हवा!

Subscribe

भूतबाधा झाल्याच्या कारणावरून मायलेकाची अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या कल्याण भागात घडली होती, तर नरबळीच्या घटना, प्रयत्न विदर्भ, मराठवाड्यात नवे नाहीत. बुवाबाजीतून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना महाराष्ट्रात घडली. या घटनांमुळे विज्ञानवादी आणि नेहमीच नव्या विचारांची दृष्टी जगाला देणार्‍या महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. भारतीय राज्यघटनेने श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकातील वादामुळे त्याचे निकष ठरवणे तसेच याविषयी सामान्य नागरिकांना पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे.

ठाणे जिल्ह्यात वनविभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत मागील आठवड्यात स्टार जातीची दुर्मीळ कासवे जप्त करण्यात आली. अठरा नखे आलेल्या कासवांचा वापर कथित काळी जादू, भाग्योदय विधी म्हणून अंधश्रद्धेतून केला जातो. त्यासाठी अशा कासवांची तस्करी होते. असाच प्रकार मांडूळ या निरुपद्रवी सर्पाबाबतही केला जातो. हा सर्प ज्या ठिकाणी आढळतो त्या ठिकाणी जमिनीत गुप्तधन असल्याची अंधश्रद्धा या सापाला कमालीची दुर्मीळ प्रजाती होण्यास कारण ठरते. घोरपड, ससे, काळी चिमणी, बिबट्याची नखे असे घटक मिळवण्यासाठी प्राण्यांच्या हत्या केल्या जातात.

या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांविरोधात मागील चार दशकांपासून विज्ञानवादी भूमिका घेऊन लढा देणार्‍या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीस २०२३ चा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा गौरव झाला असतानाच नागरिकांनीही श्रद्धा-अंधश्रद्धा यातील पुसटशी सीमारेषा समजून घ्यायला हवी. या विषयावर सहकार्यपूर्ण प्रबोधन झाल्यास सामाजिक कार्य करणार्‍या संस्था समित्यांना व्यसनमुक्ती, रोजगार, शिक्षण, गरिबी या प्रश्नांवर काम करण्यास पुरेसा अवकाश मिळेल.

- Advertisement -

भूतबाधा झाल्याच्या कारणावरून मायलेकाची अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या कल्याण भागात घडली होती, तर नरबळीच्या घटना, प्रयत्न विदर्भ, मराठवाड्यात नवे नाहीत. बुवाबाजीतून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना महाराष्ट्रात घडली. या घटनांमुळे विज्ञानवादी आणि नेहमीच नव्या विचारांची दृष्टी जगाला देणार्‍या महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. भारतीय राज्यघटनेने श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकातील वादामुळे त्याचे निकष ठरवणे तसेच याविषयी सामान्य नागरिकांना पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोहोंमध्ये तार्किकदृष्ठ्या महद्ंतर नाही.

माणसं श्रद्धाळू असतात किंवा अंधश्रद्धाळू. देव किंवा परमेश्वरावर माणसाचा विश्वास असतो. जोपर्यंत श्रद्धा व्यक्तिगत स्वरूपात असते तोपर्यंत त्यामध्ये भग्वत स्वरूप असते. श्रद्धेमागे हेतू, उद्दिष्ट नसतात, श्रद्धेमागे मागणेही नसते, श्रद्धेमागे केवळ धन्यतेची भावना असते. या धन्यतेच्या भावनेने ज्यावेळी माणूस त्या परम ईश्वराची प्रार्थना करतो, त्यावेळी त्याला शब्दांचीही गरज नसते. त्याचे मौनच बोलके असू शकते. विश्वनिर्मात्याला कोणतीही गोष्ट मागण्याची गरज कधीही नसते. ज्याने अवघे विश्व बनवले आहे त्याला काय द्यावे, अशी कोणती गोष्ट आहे ज्यावर आपली मालकी आहे. जे काही आहे तो या असीम निसर्गाचाच भाग आहे. त्याहून वेगळे असे काहीच नाही, पण निसर्गाला श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या गुंत्यात अडकवण्याचे आपल्याला सोयीस्कर ठरणारे काम माणूस करत असतो.

- Advertisement -

परमेश्वर शाप देत नसतो, तो कुणाचं वाईटही करत नाही. अगदी तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक तसेच राजकीय कायद्यानुसार वाईट ठरवलेल्या व्यक्तींसाठीही त्या निसर्गाच्या मनात असीम करुणाच असते. द्वेष, सूडभावना निसर्गात काम करत नाही. ती माणसांमध्ये असते, मात्र मानवी जाणिवा माणसांनी परमेश्वरालाही जोडल्या आहेत. त्यामुळे माणसांचा परमेश्वर हा माणसासारखा दिसतो. जर हत्तीच्या कळपांनी परमेश्वराची कल्पना केल्यास त्यांचा परमेश्वर हत्तीपेक्षा वेगळा नसेल. हरणांच्या, घोड्यांच्या, अगदी गाढवांनीही त्यांच्या परमेश्वराची कल्पना मांडली तरी त्यातल्या त्यात सुंदर आणि देखण्या गाढवाच्या रुपाला गाढवं आपला परमेश्वर मानतील. ज्याने सुंदर विश्वाची निर्मिती केली तो कुरुप, सर्वसामान्य दिसणारा असेलच कसा, हा भ्रम मानवी जाणिवेची मर्यादा स्पष्ट करतो. त्याच्या जगात काहीही कुरुप नाही, काहीही सामान्य नाही. स्वरुप, सुंदर आणि कुरुप असा फरक त्याच्या जगात नाही, मात्र माणसाने बनवलेल्या सौंदर्यशास्त्राचे नियम माणसांनी त्या परमेश्वरालाही लावले आहेत. त्यामुळेच माणसांची परमेश्वराची संकल्पनाही दूषित आहे.

माणसांमध्ये ईश्वर असल्याचे म्हणणारा समुदाय देवस्थानांसमोर तासन्तास रांगा लावतो. हा तोच समुदाय असतो जो एखाद्या नावाजलेल्या देवस्थानाकडे जाताना अपघात होऊन वाचल्यास देवाने वाचवले असे म्हणतो आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास देवाकडे जाताना त्याचेच बोलावणे आले म्हणतो. आपल्या सोयीनुसार केलेली देवाची ही व्याख्या असते. माणूस आणि दैववादी संकल्पना यात ज्यावेळी भीती तयार होते त्यावेळी श्रद्धेची जागा ही अंधश्रद्धाच घेते. नवसे कन्या पुत्र होती, तर का करावे लागे पती…अशा आशयाचा संदेश संत तुकारामांनी आपल्याला दिलेला आहे, मात्र एवढे असूनही पुत्र किंवा अपत्यप्राप्तीसाठी नरबळी दिल्याच्या घटना घडतात. माणूस स्वार्थी, दांभिक, मूर्ख, हिंसक, विकृत असू शकतो, मात्र या विकृतीचे खापर फोडण्यासाठी त्याला परमेश्वरी संकल्पना सोयीची असते. नरबळीची इच्छा हीच परमेश्वराच्या इच्छेविरोधात आहे. कुठल्याही गोष्टीचा बळी देण्याची संकल्पनाच परमेश्वरविरोधी आहे. तशीच अपत्यप्राप्तीसाठी परमेश्वराला काही देण्याचे आमिष दाखवणे हा शुद्ध आणि स्वच्छ मूर्खपणा आहे. देव-घेव किंवा काही दिल्यावर काही घेण्याची इच्छा ही मानवाच्या व्यवहारवादाची असू शकते, पण देवाच्या बाबतीत असा व्यवहार खरेतर योग्य नाही. कारण तो केवळ श्रद्धेचा भाग आहे.

महाराष्ट्रात याआधी पैशांचा पाऊस पाडण्याच्या घटना घडल्या होत्या. पैसा म्हणजे त्या चलनाच्या किंमतीच्या बदल्यात एखादी त्याच किमतीची सममूल्य वस्तू मिळवण्यासाठी दिलेला अधिकार. हा अधिकार त्याला असतो ज्याच्याजवळ संबंधित मूल्याचे चलन अर्थातच नोट असते. आता प्रश्न असा आहे की चलन किंवा नोटा किती असाव्यात, त्याचे बाजारमूल्य काय असावे, त्या किती छापल्या ज्याव्यात हे ठरवण्याचे अधिकार सरकारमधील वित्तीय यंत्रणा आणि रिझर्व्ह बँकेला असतात. म्हणजेच रिझर्व्ह बँक सोडून इतर पद्धतीने आलेल्या छापलेल्या मिळवलेल्या नोटा किंवा पैसा हा बेकायदाच असणार. नोटांचा पाऊस कधीही पडत नाही, हा भाग त्यानंतरचा आहे. मुंबई, ठाणे किंवा राज्यातील इतर ठिकाणी मांडूळ सर्पाची लाखो रुपयांना बेकायदा खरेदी-विक्री करणारे पोलिसांकडून पकडले जातात. हा सर्प माती, चिखलात आढळतो. कथित काळ्या जादूसाठी तसेच कथित गुप्तधन मिळवण्यासाठी या सर्पाचा वापर केला जातो. हा साप गुप्तधन शोधतो, असा मूर्ख समज असलेले या सर्पाची खरेदी-विक्री लाखो रुपयांना करतात.

असाच प्रकार कासवाविषयी मानला जातो. विशिष्ट नखांची संख्या असलेले कासव धनलाभ करून देते असे मानले जाते. त्यामुळे अशा कासवांचीही बेकायदा खरेदी-विक्री लाखो रुपयांना केली जाते. कोंबडे, बकर्‍यांचा बळीही याच प्रकारात मोडतो. मुळात बळी हीच संकल्पना विवेकाला आव्हान असते. त्यामुळे त्याबाबत संबंधित परंपरा मानणार्‍यांमध्ये दरवर्षी वाद विवाद होतात. ज्या ठिकाणी माणसांच्या अंगात देव येऊ शकतो त्याच ठिकाणी नकारात्मक अर्थाने माणसांच्या अंगात भूत ही संकल्पनाही संचारू शकते, मात्र या दोन्ही कल्पना परस्परविरोधी आहेत, परंतु त्यातील अंधश्रद्धेचे तत्त्व एकच आहे. मला भुताने झपाटलेले आहे ही भूतलावरील अंधश्रद्धा ठरते. त्याच न्यायाने माझ्या अंगात देव संचारतो ही देव या संकल्पनेवरील अंधश्रद्धा असते. यातील नकारात्मक गोष्टीपासून सुटका मिळवण्यासाठी वेदनादायक असे कथित उपचार केले जातात, ज्यातून माणसांचा बळी जातो. हाच प्रकार कल्याणमध्ये मागील वर्षी घडला.

निसर्गात अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत. हा निसर्ग अंतराळ, अमर्याद आहे. सध्या सुरू असलेली कोरोनाची साथ हासुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे. त्यामुळे त्यावरील लसही निसर्गातूनच शोधली जात आहे. या दोहोंमध्ये कुठल्याही अनैसर्गिक शक्तीला कुठलेही स्थान नाही. इथे केवळ आणि केवळ विज्ञान आहे. प्रश्न ज्या ठिकाणी सापडतो उत्तरही त्या ठिकाणीच असते. संशोधक केवळ ते शोधून दाखवतात हा विज्ञानाचा साधा सरळ नियम आहे. म्हणूनच विज्ञानातील तपासाला शोध म्हटले जाते, निर्मिती नाही. निर्मिती करणारा तो निराकार परमेश्वर असतो ही श्रद्धा मानवी जगण्याला बळ देते, प्रेरणा देते, तर अंधश्रद्धा देवाची किंवा नकारात्मक कथित शक्तींची भीती दाखवते. विशिष्ट कर्मकांडे, उपासना पद्धती जोपर्यंत इतरांना त्रासदायक ठरत नाहीत, तोपर्यंत ती श्रद्धा असते, परंतु ज्यावेळी या घटकांच्या नावाने माणसांना, जीवांना त्रास दिला जातो, त्यावेळी ती स्पष्ट, स्वच्छ अंधश्रद्धाच असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -