घरठाणेअहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव

अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव

Subscribe

कोरोना उपचार घेणारे १० रुग्ण दगावले

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात लागलेल्या भीषण आगीत १० जण होरपळून मृत्यूमुखी पडल्याची गंभीर घटना घडली आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना संसर्ग पसरल्यानंतर उपचार घेणार्‍या इस्पितळात आगी लागण्याची राज्यातील ही तिसरी घटना होय. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून, त्यांनी या घटनेनंतर तात्काळ पालकमंत्री हसन मुश्रिफ आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करून हलगर्जीला जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे आदेश दिले. चौकशीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्या आहेत.

शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे दोन बंब तात्काळ रवाना झाले. आग लागल्यानंतर रुग्णालयात नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांनी रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतकी प्रचंड होती की यात या कर्मचार्‍यांचाही नाईलाज झाला. यामध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर सात जण गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामन दलाने युद्धपातळीवर हालचाल करत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरल्याने इतर रुग्णही धुराने कोंडले. मात्र, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने संकट टळले. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही तात्काळ इस्पिळाला भेट देऊन घटनेची पाहणी केली.

- Advertisement -

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पोखराणा यांनी या घटनेनंतर इस्पितळातील इतर २० रुग्णांना इतरत्र हलवण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रुग्णालयातील या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. आगीच्या घटना घडल्यानंतर इस्पिळांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरी या इस्पितळाचे फायर ऑडीट का झाले नाही, असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

आयसीयू दुर्घटनांमध्ये वाढ
देशात कोरोना संकटाच्या काळात रुग्णालयांच्या आयसीयू युनिटमध्ये आगी लागल्याच्या अनेक घटना घडल्या. विरार, पालघरमध्ये अशाप्रकारच्याच घटना घडल्या होत्या. याशिवाय नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना एप्रिल 2021 मध्ये घडली होती.

- Advertisement -

पालकमंत्री अहमदनगरमध्ये
अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ हे कोल्हापूरमध्ये होते. दुपारी त्यांना माहिती देताच ते अहमदनगरकडे रवाना झाले. त्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून घटनेची सारी माहिती घेतली. प्रत्यक्षात इस्पिळाला भेट दिल्यावर पालकमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेला जबाबदार असलेला कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हसन मुश्रिफ यांनी स्पष्ट केले.

अमित शहांकडून शोक
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूला लागलेल्या आगीची दुर्दैवी घटना खरोखरच भीषण आहे. आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो – अमित शहा

आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा-फडणवीस
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात लागलेली भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी असून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी ट्विट करून केली आहे.

९ जानेवारी २०२१ रोजी
भंडारा जिल्हा हॉस्पिटलमधील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात ८ मुली तर २ मुलांचा समावेश होता. या आगीत ३ बालकांचा होरपळून तर ७ बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता.

२६ मार्च २०२१
भांडूपमधील ड्रीम मॉलमधील कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत ११ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.

९ एप्रिल २०२१ रोजी
नागपूरमधील वाडी येथील वेल्ट्रिट कोविड केअर सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत ४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.

२३ एप्रिल २०२१
विरारमधील कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात रोजी भीषण आग लागली होती. त्यात १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.

२४ एप्रिल २०२१
नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन हॉस्पिटलमधील २४ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात ‘महाराष्ट्रातील अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत लोकांच्या मृत्यूने दु:खी आहे. शोकसंतप्त कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत’ अशी कामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
‘महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो तसंच दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांसाठी लवकरात लवकर बरे होण्याची कामना करतो’, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.

१५ दिवसात अहवाल
या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या चौकशी समितीत आठ तज्ज्ञांचा समावेश असेल, असे अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी सांगितले. या समितीचा अहवाल १५ दिवसात देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुश्रिफ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -