घरमुंबईचौदा लाखांचे दागिने काही तासांत शोधले

चौदा लाखांचे दागिने काही तासांत शोधले

Subscribe

तक्रारदारांनी पोलिसांचे मानले आभार

रिक्षात विसरलेले सुमारे चौदा लाख रुपयांचे 355 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दहिसर पोलिसांनी काही तासांत शोधून ते दागिने तक्रारदारांना परत केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. काही तासांत दागिने मिळाल्याने तक्रारदारांनी दहिसर पोलिसांचे आभार व्यक्त केले.

अमेय अनिल टिकेकर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते त्यांच्या कुटुंबियासोबत बोरिवलीतील साईबाबा नगर, सिद्धरुळ सोसायटीमध्ये राहतात. शनिवारी रात्री ते कुटुंबियांसोबत बोरिवलीला एका नातेवाईकांच्या विवाहासाठी गेले होते. विवाह संपन्न होताच ते सर्वजण बहिणीला भेटण्यासाठी रिक्षातून निघाले. बोरिवली पूर्वेकडील श्रीकृष्णनगर, शुभ सरीता अपार्टमेंटजवळ येताच ते रिक्षातून उतरले, मात्र त्यांची केसरी टुर्सची बॅग रिक्षातच ते विसरले होते. या बॅगेत त्यांच्या आई आणि पत्नीचे सुमारे चौदा लाख रुपयांचे 355 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची दहिसर पोलिसांनी गंभीर दखल घेत या रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता.

- Advertisement -

रिक्षा क्रमांक मिळताच त्याच्या माहितीवरुन पोलीस पथक गोरेगाव येथील प्रेमनगर परिसरात गेले. यावेळी ही रिक्षा नंदलाल लालमणी पाल यांच्या नावावर असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्याला संपर्क साधून पोलिसांनी अवघ्या काही तासांत ही बॅग परत मिळविली. या बॅगेत त्यांच्या पत्नीसह आईचे सर्व सोन्याचे दागिने होते. पोलीस ठाण्यात अमेय टिकेकर यांना दागिन्यांची बॅग परत करण्यात आली आहे. त्यांना दागिने मिळण्याची काहीच अपेक्षा नव्हती, मात्र दहिसर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन काही तासांत ते सोन्याचे दागिने परत मिळवून त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे संपूर्ण टिकेकर कुटुंबियांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -