अखेर करोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय!

vidhan bhavan
विधानभवन

राज्यात करोनाचे एकूण ७ रुग्ण सापडल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्याचं सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळेच्या आधीच गुंडाळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २० मार्च रोजी संपणारं अधिवेशन आता शनिवारी १४ मार्चपर्यंत म्हणजेच ६ दिवस आधीच संपणार आहे. नुकतेच मुंबईत देखील करोनाचे २ रुग्ण आढळले असल्यामुळे आता प्रशासनाकडून अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या रुग्णांवर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. याआधी पुण्यामध्ये देखील करोनाचे ५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ७वर गेली आहे.

मुंबईत करोनाचे दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू होते. मुंबईत सुरू असलेल्या सहा रुग्णांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं कस्तुरबा हॉस्पिटलच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेने स्पष्ट केलं आहे. दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू असून या रुग्णांसोबत मुंबईतील दोन सहप्रवासी देखील करोना बाधित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर, ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १८ जण पुण्यात तर १५ जण मुंबईत दाखल आहेत. शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वायसीएम हॉस्पिटलमध्ये पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण दाखल आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६३५ प्रवाशांपैकी ३७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ,बुलढाणा नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागांतून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.