घरमुंबईहमीद नाईक सिद्धीविनायकाचा निस्सिम मुस्लिम भक्त

हमीद नाईक सिद्धीविनायकाचा निस्सिम मुस्लिम भक्त

Subscribe

आरटीओचे निवृत्त कर्मचारी हमीद नाईक यांनी सर्व धर्म समभावचे एक अंत्यत आदर्शवत असे उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे. हमीद नाईक यांनी निवृत्तीनंतर त्यांना आलेला १४,५०० रुपयांचा पेन्शनचा पहिला धनादेश सिद्धिविनायक मंदिराला दान केला आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हाती हमीद यांनी काल धनादेश सोपविला. १९८२ पासून मी सिद्धिविनायकाचे दर मंगळवारी न चुकता दर्शन घेत आहे. “माझा पहिला पगार मी आईच्या हातात दिला होता. २०१६ रोजी माझा आई निवर्तली. त्यामुळे निवृत्तीनंतरचा पहिला धनादेश मी तिच्या हातात देऊ शकत नाही. पण आई-वडिलांप्रमाणेच माझी सिद्धिविनायकावर श्रद्धा आहे. म्हणून हा पहिला धनादेश मी त्याच्या चरणी अर्पण करत आहे.”, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी माय महानगरशी बोलताना दिली.

…आणि सिद्धिविनायकाशी नाते जडले

हमीद नाईक मुळचे कोकणातील राजापूरचे. मुंबईतल गिरण्यांच्या सुवर्णकाळात त्यांचे कुटुंब लोअर परळमध्ये वास्तव्यास होते. लहानपणापासून त्यांचे सर्वच मित्र हिंदु धर्मातील होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांनी सिद्धिविनायकाला जायला सुरुवात केली. त्यानंतर १९८२ ला गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप झाला. १९८५ पर्यंत संप काही मिटला नव्हता. या मधल्या काळात नाईक यांच्या सर्व मित्रांनी सिद्धिविनायकाकडे नोकरी लागवी, असे साकडे घातले होते. योगायोगाने ८५ साली त्यांना आरटीओमध्ये नोकरी मिळाली आणि तेव्हापासून आजतागायत ते दर मंगळवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जात आहेत.

- Advertisement -

सिद्धिविनायकाच्या भक्तीचा विरोध झाला नाही…

हमीद सांगतात की, मी जरी सिद्धिविनायकाचा भक्त असलो तरी नमाज पठण करणे काही मी सोडलेले नाही. मराठीतून शिक्षण झाले असल्याकारणाने उर्दू वाचता येत नाही. त्यामुळे हिंदीतून नमाज पठण करतो. रमजानच्या महिन्यात रोजेही ठेवतो. मात्र आरटीओमध्ये कार्यरत असताना नोकरीच्या वेळेत कधीच नमाजला गेलो नाही. कारण मी मुख्य खिडकीवर असल्याकारणाने मला काम सोडून जाता येत नव्हते. त्यामुळे माझे मुस्लिम सहकारी म्हणायचे, ‘नमाजला वेळ नाही, मंगळवारी बरा वेळ मिळतो’ असे टोमणे मारायचे. मात्र कुराण सांगते की, काम सोडून नमाजला जाणे योग्य नाही, हा दाखला देत मी माझे काम चालू ठेवायचो. तसेच मी राहत असलेल्या ठिकाणी ९९ टक्के मराठी लोक राहतात आणि नातेवाईंकामध्ये माझ्या श्रद्धेबद्दल सर्वांना माहित होतेच, त्यामुळे मला कधीच विरोध झाला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -