कोरोनापासून वाचण्याचा ‘राम’बाण उपाय, आता राम राम म्हणा

करोना व्हायरसचे काही रुग्ण भारतात देखील आढळले असल्यामुळे आता त्यावरून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. या पार्श्वभूमीवर करोना व्हायरसपासून कसा बचाव करावा, याचे काही उपाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. त्यात रामराम करायच्या उपायाचा देखील समावेश होता.

coronavirus china
करोना व्हायरस

करोना व्हायरसने चीनसह अनेक देशात थैमान घातल्यानंतर भारतातही या व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवांचे पीक आले होते. करोना व्हायरसवर उपाययोजना आणि प्रतिबंध करण्यासाठी आज विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक रामबाण उपाय सांगितला.

आता फक्त रामराम करा!

करोना व्हायरस हा हवेतून पसरणारा व्हायरस असून यापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. जे बाधित आहेत किंवा बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनीच मास्क वापरावा. एम ९५ हा मास्क तर सामान्य लोकांनी वापरण्याचा विषयच नाही. रुग्णालयात काम करणारेच हा मास्क वापरतात. ट्रिपल लेयर मास्क हा देखील बाधित झालेल्या रुग्णांसाठी आहे. इतर लोकांनी साधा रुमाल जरी रोज धुवून वापरला तरी चालेल. हस्तांदोलन करावे की नाही? याबाबत काही सदस्यांनी प्रश्न विचारले होते. याबाबत लोकांनी आता भारतीय संस्कृतीप्रमाणे फक्त नमस्कार केला किंवा रामराम केला तरी चालेल, अशी माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई होणार

कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. कुणी सांगते की चिकन खाऊ नका, कुणी सांगते ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यावर करोना होतो. प्रत्येक जण आपल्या मनाची कल्पना व्हायरल करत आहे. अशा चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सायबर क्राईमच्या महासंचालकांशी चर्चा केली असल्याचे टोपे यांनी सांगितले. जे लोक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, त्यांच्या मुळाशी जाऊन अफवा पसरविणाऱ्यांना कडक शासन करावे, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.

घाबरू नका; मृत्यूदर फक्त अडीच टक्के

करोनाबाबत अद्याप लस शोधली नसली तरी आपल्या शरीरातील इम्युनिटी पॉवर या व्हायरसचा प्रतिकार करु शकते. करोनाच्या बाबतीत दोन टेस्ट जाणीवपूर्वक घेतल्या जातात. त्या निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णाला सोडले जाते. वृद्ध, हायपर टेन्शन असलेले आणि ज्यांची इन्युनिटी पॉवर कमी आहे, अशा लोकांना या व्हायरसचा धोका थोडा अधिक आहे. मात्र, जगभरात ज्यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे, त्यामधील मृत्यूदर फक्त २.५ ते ३ टक्के आहे. याआधी जे व्हायरस पसरले होते, त्यामध्ये मृत्यूदर १० टक्क्यांपर्यंत होता.