घरमुंबईअजून किती जणांचे बळी घेणार? सविताच्या वडिलांचा संतप्त सवाल

अजून किती जणांचे बळी घेणार? सविताच्या वडिलांचा संतप्त सवाल

Subscribe

डोंबिवलीत लोकलच्या गर्दीने आज आणखी एक बळी घेतला. या अपघातातील मृत सविता नाईकच्या वडिलांनी प्रशासनाला प्रश्न केला आहे. 

घरून शिक्षणाला विरोध असतानाही तिला शिकवले.. वृद्धपणात ती आमचा आधार होईल अशी मनात आशा होती. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. तिला आमच्यापासून हिरावून घेतलं. लोकलच्या गर्दीचे रेल्वे अजून किती बळी घेणार? असा संतप्त सवाल सविताचे वडील फारूक नाईक यांनी डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत केला. कोपर-दिवा या स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सविता हिचा सोमवारी मृत्यू झाल्याने सर्वत्रच हळहळ व्यक्त होत आहे.

savita naik
मृत सविता नाईक

डोंबिवलीची फास्ट लोकल पकडणे ठरले जीवघेणे

डोंबिवली पूर्वेतील सांगर्ली परिसरात सविता ही आई-वडील, एक भाऊ आणि बहिणीसह राहत होती. मुंबईत एका खाजगी कंपनीत अकाऊंटन्ट म्हणून नोकरी करीत होती. डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज ती ८ वाजून १५ मिनीटांची जलद लोकल पकडते. नेहमीप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वे स्थानकातून जलद लोकल पकडली. गर्दीतून वाट काढत तिने कशीबशी लोकल पकडली. मात्र गर्दीमुळे तिला डब्ब्यात आतमध्ये शिरता आले नाही. प्रचंड गर्दीच्या रेट्यामुळे कोपर-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडली. एक तरुणी लोकलमधून खाली पडल्याचे समजताच डोंबिवली लोहमार्ग पेालिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सविता ही रूळावर जखमी अवस्थेत पडली होती. महिला पोलीस कुसूम भोजणे आणि बाबर या दोघींनी तिला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पीटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisement -

हेही वाचा – चालत्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील तरुणीचा मृत्यू

अपघात रोखण्यासाठी सरकारकडून कोणतेच प्रयत्न नाही

सविताचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिच्या मोबाईलवरून कुटुंबियांना तिच्या अपघाताची माहिती कळवली. सविताच्या मृत्यूची बातमी ऐकताच आई-वडील व भाऊ धाय मोकलून रडू लागले. तिला एक बहीण असून ती गावी आहे. लोकलमधील गर्दीमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मग हे अपघात रोखण्यासाठी सरकार कोणतेच प्रयत्न करीत नसल्याची नाराजी तिच्या वडिलांनी व्यक्त केली. या अपघातानंतर गर्दीने भरलेल्या लोकल आणि त्यामुळे या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवलीकरांचा प्रवास जीवघेणा ठरतोय…

डोंबिवली रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळी लोकलमध्ये चढणे आणि उतरणे खूपच मुश्किल असते. प्रचंड गर्दीच्या रेट्यातून डोंबिवलीकरांना प्रवास करावा लागतो. आणि त्याच रेट्यातून धक्के खात घरी परतावे लागत आहे. लोकलमधील गर्दीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. जून महिन्यात रविकांत चाळकर, फेब्रुवारी महिन्यातच नितेंद्र विरेंद्र यादव या २० वर्षीय तरुणाचा तर यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे तरुणही लोकलचे बळी ठरले होते. त्यामुळे डोंबिवलीतील लोकलमधील गर्दी आता जीवघेणी ठरू लागली आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला ठोस उपायोजना कराव्या लागणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -