घरमुंबईससेहोलपट

ससेहोलपट

Subscribe

क्रिक्रेटची पंढरी लॉर्ड्सवर इंग्लंडने भारताचा १ डाव आणि १५९ धावांनी पराभव करून पतौडी ट्रॉफी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. सततच्या क्रिक्रेटमुळे (कसोटी, वनडे, टी-20, आयपीएल) भारतीय कर्णधार विराट कोहलीला पाठदुखीने त्रस्त केले असून ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर येत्या शनिवारपासून ट्रेंट ब्रिज,नॉटिंगहॅम येथे सुरू होणा-या तिस-या कसोटीत विराट कोहली खेळेल अशी आशा बाळगूया.

दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ इंग्लंडमध्येही ढिसाळ फलंदाजी तसेच विराट कोहली-रवी शास्त्री जोडगोळीच्या चुकांची (संघ निवडीतील गफलती) किंमत भारतीय संघाला मोजावी लागत आहे. क्रिक्रेटची पंढरी लॉर्ड्सवर इंग्लंडने भारताचा १ डाव आणि १५९ धावांनी पराभव करून पतौडी ट्रॉफी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. सततच्या क्रिक्रेटमुळे (कसोटी, वनडे, टी-20, आयपीएल) भारतीय कर्णधार विराट कोहलीला पाठदुखीने त्रस्त केले असून ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर येत्या शनिवारपासून ट्रेंट ब्रिज,नॉटिंगहॅम येथे सुरू होणा-या तिस-या कसोटीत विराट कोहली खेळेल अशी आशा बाळगूया.
परदेश दौर्‍यात त्यातही इंग्लंडसारख्या लहरी वातावरणात खेळताना भारताची त्रेधातिरपीट उडते हे वारंवार दिसून आले आहे. १९३२ -२०१४ दरम्यान भारताच्या खात्यात इंग्लंडविरुध्द इंग्लंडमध्ये तब्बल ३० पराभव जमा होते.

त्यात आता भर पडली आहे ती एजबॅस्टन, लॉर्ड्सच्या पराभवांची. यादरम्यान भारताने इंग्लंडमध्ये केवळ ६ कसोटी जिंकल्या. विजयाच्या ५ पटीने पराभव ही भारताची इंग्लंडमधील कर्मकहाणी ! परदेश दौ-यातील गेल्या ५ कसोटीत भारताला त्रिशतकी मजल केवळ एकदाच मारता आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या शतकामुळे सेंच्युरीयन कसोटीत भारताने द.आफ्रिकेविरूध्द त्रिशतकी मजल मारली होती. एजबॅस्टन कसोटीत विराटच्या १४९ धावांच्या झुंजार खेळीमुळे भारताने २७४ धावा केल्या. भारताचा एकांडा शिलेदार अशीच विराटची प्रतिमा होते आहे. लॉर्ड्स कसोटीत कर्णधार १३ व १७ धावा काढून बाद झाल्यामुळे भारताला दिडशेचा टप्पाही गाठता आला नाही.

- Advertisement -

इंग्लंडमधील कुंद वातावरणात ड्यूक चेंडूच्या स्विंगवर भल्याभल्यांची दाणादाण उडते ती अँडरसन, ब्रॉड या तेज जोडगोळीसमोर. इंग्लंडच्या या तेज दुकलीने तब्बल ९७७ मोहरे टिपले आहेत. १४१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात भेदक आणि यशस्वी जोडी ! अँडरसन ब्रॉडला साथ लाभली आहे ती क्रिस वोक्स, सॅम करन यांची. लॉर्ड्स कसोटीत बेन स्टोक्सची उणीव इंग्लंडला जाणवली नाही. त्याच्या जागी आलेल्या क्रिस वोक्सने दिमाखदार शतक तर झळकावलेच, शिवाय मोक्याच्या क्षणी विकेट्सही काढल्या. इंग्लंडची कामगिरी इतकी प्रभावी ठरली की आदिल रशीदला लॉर्ड्स कसोटीत फलंदाजी तसेच गोलंदाजी करावी लागली नाही. पावसाने व्यत्यय आणलेल्या या कसोटीत भारतीय संघ एकदा नव्हे तर दोनदा कोसळला. दोन्ही डावात जेमतेम शंभरी त्यांनी गाठली. भारतातर्फे सर्वाधिक धावा केल्या त्या तळाच्या अश्विनने!

सलामीची समस्या हे भारतीय क्रिकेटचे जुनेच दुखणे. सुनील गावस्करसारखा तंत्रशुध्द, विक्रमी सलामीवीर भारताला लाभला. परंतु चेतन चौहानचा अपवाद वगळता सुनीलला भरवशाचा साथीदार क्वचितच लाभला. विरेंदर सेहवाग, गौतम गंभीर या दिल्लीकर बिनीच्या शिलेदारांनी काही काळ आपला जम बसवला.परंतु त्यानंतर सलामीच्या जोडीची समस्या आजतागायत कायम आहे. मुरली विजय गेल्या १० कसोटी डावात (परदेश दौ-यातील) सतत अपयशी ठरतो आहे. शिखर धवनच्या रामभरोसे खेळावर कोहली-शास्त्रीचा विश्वास नाही. लोकेश राहुलला सलामीवीराची भूमिका जमत नाही. तर चेतेश्वर पुजारा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचाही सूर हरवलेला दिसतोय. कर्णधार विराट कोहलीला क्वचितच इतरांची साथ लाभते. त्यामुळे मधली फळीही डळमळीतच.

- Advertisement -

वृध्दिमान सहाच्या दुखापतीमुळे तामिळनाडूच्या दिेनेश कार्तिकला कसोटी पुनरागमनाची संधी मिळाली. परंतु छोटया चणीच्या दिनेशला यष्टिरक्षणात सफाई दाखवता आली नाहीच पण फलंदाजीतही तो पार ढेपाळला. त्यामुळे दिल्लीचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. हार्दिक पंडयाकडून सध्यातरी अष्टपैलू खेळाची अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल!

द.आफ्रिकेतील कसोटी मालिकेत ६० मोहरे टिपणा-या भारतीय गोलंदाजांनी एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडला दोनदा गारद करण्याची किमया केली. परंतु लॉर्ड्सवर इशांत शर्मा, मोहम्मद शमी, हार्दिक पंडया या मध्यमगती त्रिकुटाच्या मार्‍याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. शतकवीर क्रिस वोक्सने बेअरस्टोच्या साथीने १८९ धावांची भागी रचली. पावसाळी वातावरणात अश्विनसह ’चायनामन’ कुलदीप यादवची निवड करण्यात आली. लॉर्डस् कसोटीत दोन फिरकी गोलंदाज खेळवण्याचे कोहली-शास्त्री यांचे डावपेच चुकीचे ठरले. या दोघांनी मिळून २६ षटके टाकली, पण त्यांच्या बळींची पाटी कोरीच राहिली. कुलदीपऐवजी उमेश यादवला पसंती दिली असती तर बरे झाले असते. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांच्या दुखापतीमुळे कोहलीची गोची झाली आहे. पंडयाने तीन मोहरे टिपले पण त्यासाठी त्याने बर्‍याच धावा मोजल्या.

शास्त्री-कोहली दोघेही आक्रमक वृत्तीचे, कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमपणाला सावधतेची जोड आवश्यक असते. परंतु सदैव आक्रमणावरच भर देणार्‍या शास्त्री-कोहली यांना संयमाची गरज आहे हे कोण समजवणार? २०११ पासून भारतीय क्रिक्रेटच्या कामगिरीवर नजर टाकल्यास वनडे (वर्ल्डकप विजय २०११, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३), टी-२० क्रिक्रेट यात भारताला यश लाभले असले तरी कसोटी क्रिकेट खास करून परदेश दौ-यात यश लाभलेले नाही. २०११ ऑस्ट्रेलिया दौरा, इंग्लंड दौरा (२०११, २०१४) भारतासाठी खडतर ठरला होता. यंदा द. आफ्रिका दौर्‍यातही भारताला २-१ असे पराभवाला सामोरे जावे लागले. केपटाऊन, सेंच्युरियन कसोटी सामने गमावणार्‍या भारताने वाँडरर्सची तिसरी कसोटी जिंकली.

त्यापाठोपाठ इंग्लंड दौर्‍यात एजबॅस्टन, लॉर्ड्स कसोटीतही मार खाल्ला. शनिवारपासून टेंटब्रिजवर तिसरी कसोटी खेळली जाईल. टेंट ब्रिज आणि अँडरसन यांचे अतूट नाते आहे. स्टोक्सने पुनरागमन केल्यास अँडरसन, ब्राँड, स्टोक्स, करन या इंग्लंडच्या तेज चौकडीचा सामना कोहली आणि त्याच्या सहकार्‍यांना करावा लागेल. कमकुवत भारतीय फलंदाजीसमोर हे मोठे आव्हान असेल. त्यात तावून सुलाखून निघाल्यास ठिकच अन्यथा ही ससेहोलपट सुरूच राहील.


– शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -