घरमुंबईभिवंडीत आदर्श लग्न समारंभ

भिवंडीत आदर्श लग्न समारंभ

Subscribe

पाहुण्यांना रोपटे, हेल्मेट,हळदीचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी

लग्न म्हटले की थाटामाट आणि बडेजावपणा तसेच अनावश्यक खर्च, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र भिवंडी शहरातील युवकाने आपल्या बहिणीच्या लग्नातील हळदी समारंभ , मंडप सजावट व अन्य अनावश्यक खर्च टाळून लग्न सोहळ्यास वधूवरांना शुभशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना तब्बल ६०० वृक्षांची रोपे , ३०० कापडी पिशव्या व ३० हेल्मेट वितरित करीत असतानाच दोन गरीब विद्यार्थिनींची वर्षभराची शाळेची फी भरून समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे.

भिवंडी शहरातील पद्मानगर येथील कुसमा कुटुंबियातील मानसा हीच शुभविवाह श्रीकांत यांच्या सोबत पद्मशाली समाज हॉल या ठिकाणी आयोजित केला होता. वधू मानसाचा भाऊ विघ्नेश याने आपल्या बहिणीच्या लग्न सोहळ्या प्रसंगी ही उत्तम संकल्पना राबविली असून पर्यावरणाचा र्‍हास थांबवा यासाठी लग्नकार्यातून वृक्षारोपणाचा संदेश दिला. त्यासोबतच प्लास्टिक बंदी झाल्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी कापडी पिशव्या वापरण्याचाही संदेश दिला. यावेळी लग्नसमारंभात आलेल्या पाहुण्यामंडळींना कापडी पिशव्यांची भेट देण्यात आल्याचे विघ्नेश कुसमा यांनी सांगितले. रस्त्यावरील अपघातात हेल्मेट घातले नसल्याने कित्येकांचा दुर्दैवी मृत्यू होत असतो. अशा वेळी त्या कुटुंबियांवर आभाळ कोसळते.

- Advertisement -

पण जर दुचाकी वाहनचालकांनी त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचू शकतो, हा संदेश देण्यासाठी आणि याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी लग्नसमारंभात पाहुण्यांना हेल्मेटचीही भेट देण्यात आल्याचे विघ्नेश म्हणाले. देशात अनेक मुली घरच्या गरिबी मुळे शिक्षण अर्धवट सोडून देतात. त्यासाठी हळदी समारंभ न करता त्यातून वाचविलेली रक्कम सत्कारणी लागावी यासाठी समाजातील दोन गरीब मुलींच्या शालेय शिक्षणाची वर्षभराची फी या कुटुंबाने या अनोख्या लग्नसमारंभानिमित्ताने भरली आहे. सामाजिक भान जपणार्‍या लग्नसोहळ्यातील वधूवरास शुभाशीर्वाद देण्यासाठी भाजपा शहर अध्यक्ष संतोष शेट्टी , पद्मशाली समाजाचे नेते कृष्णा गजांगी उपस्थित होते. त्यांनी या लग्नातील सामाजिक भान जपण्याच्या उपक्रमाचे कौतूक केले. विशेष म्हणजे विघ्नेश यांच्या पुढाकाराने त्यांचे तसेच त्यांचा मोठा व लहान भाऊ या सर्वांच्या लग्नसोहळ्यात वृक्षांचे वाटप करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -