घरमुंबई'की होल' शस्त्रक्रिया ठरली फायदेशीर, ७५ वर्षीय रुग्णाचे वाचवले प्राण

‘की होल’ शस्त्रक्रिया ठरली फायदेशीर, ७५ वर्षीय रुग्णाचे वाचवले प्राण

Subscribe

७५ वर्षीय वृद्धाच्या शरीरातून मिनिमल इन्व्हेसिव्ह होल सर्जरी करून ५५० मूतखडे बाहेर काढले. या उपचारासाठी 'की होल' शस्त्रक्रिया फायदेशीर ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

डोंबिवली येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. लोकेश सिन्हा आणि युरोलॉजिस्ट व लॅपरोस्कोपिक शल्यविशारद डॉ. प्रदीप राव यांच्या नेतृत्वाखालील टीमने ७५ वर्षीय वृद्धाच्या शरीरातून मिनिमल इन्व्हेसिव्ह होल सर्जरी करून ५५० मूतखडे बाहेर काढले. १ सेंटिमीटरचे एक छिद्र पाडून एकाच प्रयत्नात उजव्या मूत्रपिंडातून आणि मूत्रामार्गातून सर्व खडे बाहेर काढले. या शस्त्रक्रियेमुळे आता रुग्णाला नवीन जीवनदान मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. ७५ वर्षीय रुग्ण राठोड यांना ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या. काही तपासण्या आणि अल्ट्रासाउंड चाचणी केल्यानंतर उजव्या मूत्रपिंडात मूतखडे असल्याचे निदान झाले आणि हे खडे काढण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. किमान छेद देत की होल सर्जरी तंत्राचा वापर करून ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

“रुग्णाच्या ओटीपोटात शस्त्रक्रियेच्या काही दिवस आधी वेदना होत होत्या. त्या शिवाय मूतखड्यांची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. अल्ट्रासाउंड आणि सीटी स्कॅन केल्यानंतर मूतखड्यांचे अस्तित्व दिसून आले. ते काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या उजव्या मूत्रपिंडात आणि मूत्रमार्गात ५५० मूतखडे आढळून आले. किमान छेद देणाऱ्या तंत्राचा वापर करून दीड तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.” – कन्सल्टंट युरोसर्जन डॉ. लोकेश सिन्हा,  एसआरव्ही ममता हॉस्पिटल

- Advertisement -

ही आहेत कारणे

विरघळलेल्या क्षारांचे राहिलेले कण मूत्रपिंडांच्या आतील बाजूस साचत जाऊन मूतखडा तयार होतो. डिहायड्रेशन, मूत्रविसर्जनातील अडथळा किंवा जन्मजात असलेल्या आजारामुळे मूत्रामध्ये मूतखडा तयार करणाऱ्या क्षारांचे उत्सर्जन यामुळे मूतखडे तयार होतात. त्यात बहुधा कॅल्शिअम ऑक्सेलेट असते पण इतरही संयुंगापासून ते तयार होऊ शकते. त्यांचा आकार गोल्फच्या बॉलएवढा असू शकतो आणि त्यांची टोकदार स्फटिकांसारखी रचना असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -