“उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात, पण याच तोतऱ्याने…”, किरीट सोमय्यांचं चॅलेंज

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर टीका करताना त्यांना 'पोपटलाल' असं म्हटलं. त्यांच्या या टीकेवर आता किरीट सोमय्यांनी प्रत्त्यूत्तर दिलंय.

Bjp Kirit Somaiya

आर्थिक घोटाळ्यांची खडानखडा माहिती काढणारे किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. याच प्रकरणी सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. यावरून आता किरीट सोमय्या आणि संजय राऊतांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर टीका करताना त्यांना ‘पोपटलाल’ असं म्हटलं. त्यांच्या या टीकेवर आता किरीट सोमय्यांनी प्रत्त्यूत्तर दिलंय. सोबत त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील चॅलेंज दिलंय.

संजय राऊत यांनी दिलेल्या किरीट सोमय्यांना दिलेल्या शिव्यांचा उच्चार करत किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत हे प्रत्तूत्तर दिलंय. संजय राऊतांनी मला शिव्या दिल्या, पोपटलाल म्हणतात. त्यावरून त्यांची संस्कृती दिसते, असं सोमय्या म्हणालेत. खालच्या पातळीचे लोकं आहे की खालच्या पातळीची भाषा बोलतात असं म्हणत सोमय्या यांनी संजय राऊत यांना डिवचलं आहे.

‘संजय राऊत मला पोपटलाल म्हणतात, शिव्या देतात, उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात. पण याच तोतऱ्याला घाबरून तुम्ही रश्मी ठाकरेंचे १९ बंगले पाडले. आता त्याचा हिशोब मागितला तर द्या ना…” असं म्हणत किरीट सोमय्या बरसले. तसंच याच तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान असल्याचं देखील किरीट सोमय्यांनी सांगितलं.

साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना अटक झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं आहे. रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचे प्रकरण किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा उकरून काढलंय. मध्यंतरी या प्रकरणाविषयी सर्वचजण मौन बाळगून होते. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा सक्रिय झालेले पहायला मिळत आहेत.