घरमुंबईउल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी विजयी

उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी विजयी

Subscribe

कलानी कुटुंबाच्या वर्चस्वाला धक्का

उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात भाजपचे कुमार आयलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचा 2004 मतांनी पराभव करीत गेल्या विधानसभा निवडणुकीचा वचपा काढला. या विधानसभा क्षेत्रात मुख्य लढत ही आयलानी विरुद्ध कलानी अशीच होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरमध्ये प्रचारसभा घेऊन हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा असल्याचे संकेत दिले होते. या पराभवामुळे पप्पू कलानी आणि त्यांच्या उल्हासनगरातील वर्चस्वाला धक्का बसला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी या निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या कुमार आयलानी यांचा 1863 मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत कुमार आयलानी यांनी त्यांच्या पराभवाची परतफेड करीत ज्योती कलानी यांचा 2004 मतांनी पराभव केला.

- Advertisement -

या विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेना-आरपीआय व साई पक्षातर्फे कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योती कलानी, आरपीआयचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव व वंचित बहुजन आघाडीतर्फे साजन लभाना निवडणूक रिंगणात होते. भाजपचे कुमार आयलानी यांना 43666, राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना 41662, आरपीआय बंडखोर भगवान भालेराव यांना 8260 तर वंचितचे साजन लभाना 5689 एवढी मते मिळाली. कुमार आयलानी यांनी कलानी यांचा 2004 मतांनी पराभव केला.

ज्योती कलानी या भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामादेखील दिला होता. मात्र, भाजपने कुमार आयलानी यांना उमेदवारी दिल्यानंतर ज्योती कलानी यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा घेतला. कलानी यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. मात्र, पक्षाचा एकही स्टार प्रचारक या विधानसभा क्षेत्रात फिरकला नाही. दुसरीकडे आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, भोजपुरी स्टार व खासदार मनोज तिवारी व अनेक लोकांनी हजेरी लावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -