घरमुंबईऔषधांच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील कामगार हॉस्पिटल ऑक्सिजनवर

औषधांच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील कामगार हॉस्पिटल ऑक्सिजनवर

Subscribe

ठाण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा प्रश्न अद्यापि सुटता सुटत नाही. दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतींची दुरवस्था वाढतच आहे. त्यातच भर म्हणून ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असणारे राज्य कामगार विमा योजना हॉस्पिटलमधील भोंगळ कारभारामुळे येथे येणार्‍या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणार्‍या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत उपकरण व सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. याशिवाय, फेब्रुवारी २०१८ पासून औषधांचा पुरवठाच खंडित झाल्यामुळे हे हॉस्पिटल ‘ऑक्सिजन’वर आले आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. तसेच, विद्यमान आरोग्य मंत्र्यांनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने या हॉस्पिटल्सना वाली कोण? असा प्रश्न कामगारांना पडला आहे.

ठाणे जिह्यात हजारो लहान मोठे उद्योग आहेत. ज्यामध्ये लाखो कामगार काम करीत आहेत. ज्या परिसरात हे रुग्णालय आहे, तेथील वागळे इस्टेट हा परिसरच उद्योगनगरी म्हणून विकसित आहे. उद्योग व कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाईन, बेंझिन, मॅगनीज इत्यादी घातक रसायने व नायट्रेटच्या धुरामुळे कामगारांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून या हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली. याकरिता कामगारांकडून कोट्यवधींची रक्कम शासनाकडे जमा होते. परंतु, या ठिकाणी गंभीर रुग्णांवर उपचारच होत नसल्याचे चित्र आहे. गुंतागुंतीच्या किंवा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागते. त्यातच आता औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णच नाही तर हॉस्पिटल प्रशासनही अडचणीत आले आहे.

- Advertisement -

औषध खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच एकत्रित औषधे खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१८ पासून ही कंपनी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनस्त वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसाठी औषधे खरेदी करणार होती. मात्र, दीड महिन्याचा कालावधी होऊनही रुग्णालयांना औषधे उपलब्ध झाली नाहीत. यामुळे सर्वच रुग्णालये अडचणीत आली आहेत. यात सर्वाधिक फटका बसला आहे तो कामगार विमा रुग्णालयाला. सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात दखल घेण्याची विनंती निवेदन पत्रात केली आहे.

फेब्रुवारी २०१८ पासून औषधांचा स्टॉक आलाच नाही. म्हणजेच तब्बल एक वर्ष रुग्ण बाहेरील मेडिकल स्टोर्समधून औषधे घेऊन आजारावर मात करण्याचा प्रयत्न करतात. याबाबत वारंवार शासनाकडे विचारणा करण्यात येत आहे.
– राहुल दातीर, औषध भांडार, अधीक्षक, कामगार हॉस्पिटल, ठाणे

- Advertisement -

मागील वर्षी या रुग्णालयाच्या स्टोअर रुमला आग लागली होती. त्यामुळे येतील अग्नि सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. मात्र, त्यावरही अद्याप कोणतीही उपाययोजना झाली नाही आणि आता तर रुग्णांच्या आरोग्याशीच खेळ होत आहे. याकडे नुकताच आरोग्यमंत्री पदाचा भार स्वीकारलेल्या ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी तत्काळ लक्ष द्यावे. जेणेकरून येणार्‍या काळात कोणतीही दुर्घटना घडणार नाही.
– अनिल म्हात्रे, ठाणे जिल्हा चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -