घरमुंबईLift Collapsed : वाशीत लिफ्ट ट्रॉली कोसळून दोन तरुण जखमी; एक गंभीर

Lift Collapsed : वाशीत लिफ्ट ट्रॉली कोसळून दोन तरुण जखमी; एक गंभीर

Subscribe

मुंबई:वाशी नाका येथे एका निर्माणाधिन इमारतीची लिफ्ट ट्रॉली मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे बाजूच्या काही घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वाशी नाका, अशोक नगर, ओम गणेश नगर येथे एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीत बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी ‘लिफ्ट ट्रॉली’ मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे तुटली व कोसळून बाजूच्या २ – ३ घरांवर पडली. या दुर्घटनेत ५ – ६ जण जखमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले.

- Advertisement -

या दुर्घटनेत, आशुतोष मिश्रा (२३) हा तरुण जखमी झाला असून शताब्दी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर दुसरा तरुण अजितकुमार मुदलियार (२३) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सुराणा या खासगी रुग्णलयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्याला आय.सी.यू. कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सदर दुर्घटना का व कशी घडली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.

कल्याणमध्ये लिफ्टच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

कल्याण पश्चिमेतील गांधारे भागातील एका सोसायटीच्या उद्वाहनाच्या खड्डयात पडून एका तेरा वर्षाच्या मुलाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. मृत मुलगा याच भागातील एका लॉन्ड्रीवाल्याचा मुलगा होता. हिमांशु कनोजा (13) असे मुलाचे नाव आहे. गांधारे भागातील रिध्दी सिध्दी सोसायटीत ही दुर्घटना घडली आहे. रिध्दी सिध्दी सोसायटी परिसरात एका लॉन्ड्रीवाला आहे. रिध्दी सिध्दी सोसायटीतील काही रहिवाशांचे इस्त्री केलेले कपडे परत करण्यासाठी लॉन्ड्री चालकाने आपला मुलगा हिमांशु याला पाठविले होते. कुटुबियांना कपडे दिल्यानंतर हिमांशु सोसायटीतील उद्वाहनाने खाली येत होता. त्यावेळी पाचव्या आणि सहाव्या माळ्याच्या मध्ये काही तांत्रिक बिघाड होऊन उद्वाहन थांबले. आता आपण उद्वाहनमध्ये अडकलो या भितीने हिमांशुने चालू उद्वाहनचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात उद्वाहन सुरू होऊन ते खाली जाऊ लागले. उद्वाहनातून बाहेर येण्याच्या गडबडीत हिमांशु तोल जाऊन उद्वाहन खालील खोल खड्ड्यात सहाव्या माळ्यावरुन पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

हायकोर्टाची लिफ्ट अचानक पडली होती बंद

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत दोन महिन्यांपूर्वी लिफ्ट बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही लिफ्ट बंद पडली. या लिफ्टमध्ये तब्बल सात जण अडकले होते. अडकलेल्आ लोकांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे रेस्क्यू ऑपरेशन राबवले आणि अडकलेल्या सातही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -