घरमुंबईलोअर परळ पुलाच्या तोडकामाला सोमवारपासून सुरूवात

लोअर परळ पुलाच्या तोडकामाला सोमवारपासून सुरूवात

Subscribe

धोकादायक असलेला लोअर परळचा ब्रीज सोमवारपासून पाडला जाणार आहे. टप्प्याटप्यामध्ये हे पाडकाम केले जाणार आहे. मात्र पूल तोडल्यानंतर तो नव्याने कोण बांधणार? याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

लोअर परळ येथील रेल्वेच्या हद्दीतील पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर रहदारीसाठी बंद करण्यात आलेला पूल अखेर सोमवारी पाडला जाणार आहे. अंधेरी गोखले पूल दूर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेने रेल्वे हद्दीतील पूलांचं ऑडीट करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये लोअर परळचा उड्डाणपूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. रविवारपासूनच या पूलावर असणारी टेलिकॉम कंपनीच्या युटिलीटी वायर्स हटवण्यात येणार आहेत. त्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. दरम्यान हा पूल तोडण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे. अवघ्या २४ तासात पूल पाडण्यासाठी ७.२ कोटीचे टेंडर मंजूर करण्यात आले. पुल तोडल्यानंतर तो नव्याने बांधणार कोण? याबद्दल मात्र कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.

वाचा –मध्य, हार्बर मार्गावर १८ पादचारी पूल धोकादायक; ६० वर्षाची कालमर्यादा ओलांडली

अंधेरी दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील गोखले पुलाचा पादचारी भाग ३ जुलैला अचानक कोसळून या दुघर्टनेत दोघांचा मृत्यू तर, तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मार्गावरील सर्वच ४४५ पुलांचे सेफ्टी ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रेल्वे, पालिका आणि आयआयटीच्या इंजिनीयर्सचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले होते. त्यावेळी लोअर परळचा धोकादायक पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला. अखेर सोमवारपासून त्याच्यावर हातोडा पडणार आहे. पुढील तीन महिन्यांपर्यंत हे काम चालणार आहे.

- Advertisement -
वाचा – माय महानगरच्या बातमीचा इम्पॅक्ट; अंधेरीतील धोकादायक पादचारी पूल होणार दुरुस्त

पूल तोडताना लागणार कसोटी

या पुलावर टेलिकॉमसह अनेक सेवांसाठी युटीलिटी वायर्स टाकण्यात आल्या आहेत. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेला २० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पुलाचा साचा १५०० चौरस मीटर्सचा असल्याने तसेच पुलाचा भार नेमका कोणत्या भागावर आहे हे स्पष्ट न झाल्याने हा ब्रिज तोडणे अवघड काम ठरणार आहे. ९० बाय ५३ मीटरचा हा पूल पाडताना रेल्वे वाहतूक पूर्णवेळ थांबवता येणार नाही. त्यासाठी छोटे ब्लॉक घेऊन तोडकाम केले जाईल. सोमवारपासून प्राथमिक स्तरावर कामांना सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्यात पाडकाम पूर्ण होईल. हा पूल पाडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डायमंड कटर तंत्रज्ञानासाठी दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. पूल पाडण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने रुळांना कोणतेही नुकसान होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

वाचा – पर्यायाशिवाय लोअर परळ पूल बंद !

मेगाब्लॉक वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

या पुलाच्या पाडकामासाठी ब्लॉक घेणे आवश्यक आहे. त्याबाबत सात ते आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. असे पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी स्पष्ट केले.

वाचा – धोकादायक लोअर परळ रेल्वे पूल २४ जुलैपासून बंद
वाचा – परळ-एल्फिन्स्टनचा नवा पादचारी पूल शनिवारपासून सुरु!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -