घरमुंबईMahim Sea Food Plaza : मुंबईतील पहिला 'माहिम सी फूड प्लाझा', 40...

Mahim Sea Food Plaza : मुंबईतील पहिला ‘माहिम सी फूड प्लाझा’, 40 हजार पर्यटकांनी दिली भेट

Subscribe

लवकरच या ठिकाणी माहिम ते दादर ते वरळी अशी बोट सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे जी/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी सांगितले.

मुंबई : अथांग समुद्रात तरंगत्या छोट्या छोट्या बोटी, मस्त सूर्यास्त, बाजूला किल्ला आणि वरळी सी लिंक अशा निसर्गरम्य वातावरणात खमंग, गरमागरम पापलेट, सुरमई, ओले बोंबील, मोठी कोलंबी, समुद्रातील रंगबिरंगी खेकडयांचे कालवण, शिंपल्या, बांगडे आणि सोबतीला सोलकडी असे मांसाहारी जेवण असलेला नवीन स्पॉट कोणता असेल, असे तुम्हाला कोणी विचारले तर अजिबात संभ्रमात पडू नका. कारण मुंबईच्या नकाशावर हे एक वेगळे स्थान निर्माण झाले असून त्याचे नाव आहे ‘माहिम सी फूड प्लाझा’

या ठिकाणी जो कोणी प्रथमतः येतो तो या ‘माहिम सी फुड प्लाझा’च्या प्रेमात पडून जातो. ती व्यक्ती आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात माहिम सी फूड प्लाझाच्या ठिकाणी मच्छीवर ताव मारत एका हाताने सेल्फी काढतो, तर कधी मावळत्या सूर्याचे, वरळी सी लिंक आणि माहिम किल्ल्यासह फोटो काढून ते आपल्या मित्र आणि नातेवाईकांना पाठवून एकदा तरी माहिम सी फुड प्लाझाच्या ठिकाणी नक्की भेट देण्याची विनंती करतो. कारण की, ‘माहिम सी फुड प्लाझा’ ची शान आणि मजाच कुछ और है

- Advertisement -

सरकारने डीप क्लिनिंग उपक्रम हाती घेतला

मुंबईला स्वच्छ, सुंदर, कचरा, प्रदूषण व खड्डे मुक्त असे शहर बनविणे आणि मुंबईत पर्यटकांना आकर्षित करणे या बहुउद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारने डीप क्लिनिंग उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर (शहर) आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (उपनगरे) हे सतत पाठपुरावा करीत आहेत. तर राज्य सरकार, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या आदेशाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अश्विनी भिडे, सुधाकर शिंदे आदी अधिकारी वर्ग कार्यरत झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule : देणार असालच तर तगडा उमेदवार द्या…सुप्रिया सुळे यांचे आव्हान

सी फूड प्लाझामुळे महिला, बचतगटांना रोजगाराची संधी

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून मुंबईतील माहिम, वरळी, सायन आदी कोळीवाड्यांच्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी व स्थानिक कोळी महिला, बचतगट यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सी फूड प्लाझा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर माहिम कोळीवाडा येथे पहिला सी फूड प्लाझा नोव्हेंबर 2023 पासून सुरू करण्यात आला. तसेच, या चौपाटीच्या जवळील माहिम किल्ल्याचे देखभाल व दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. किल्ल्याच्या सभोवताली असलेले अतिक्रमण हटविण्यात आले असून किल्ल्याच्या आजूबाजूला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, सी फूड विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. विशिष्ट प्रकारचे तंबू निर्माण करून टेबल आणि खुर्च्या यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जमिनीवर रेड कार्पेड अंथरूण एक बोट, कोळ्यांचे मासे पकडायचे जाळे त्या ठिकाणी ठेवून पर्यटकांसाठी ‘सेल्फी पॉइंट’, तयार करण्यात आले आहे.

स्थानिक महिलांना रोजगार मिळतानाच या परिसरात पर्यटनवाढीला चालना मिळावी, याच उद्देशातून कोळी महिला बचतगटांना नियोजन विभागाने साधनसामुग्री पुरवली आहे. तसेच आर्थिक पाठबळही उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व गोष्टींचा फायदा महिला बचत गटांना दैनंदिन व्यवसायात होत असून राहत्या ठिकाणीच रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे, असे संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले.

हेही वाचा – Jnanpith Award : गीतकार गुलजार, जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ

मुंबई महापालिकेतर्फे, महापालिका साहाय्यक आयुक्त व महापालिकेच्या नियोजन विभागाने प्रत्येक महिला बचतगटाला साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. सह आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख व जनसंपर्क अधिकारी व त्यांची टीम सुद्धा मदत करीत आहे.

माहिम सी फुड प्लाझा 40 हजार पर्यटकांनी दिली भेट

माहिम कोळीवाडा सी फूड प्लाझा या ठिकाणी गेल्या 2 नोव्हेंबरपासून 2023 ते आजपर्यंत तब्बल 40 हजार पर्यटक, खवय्यांनी भेट देवून मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला आहे. या सी फूड प्लाझाला प्रत्येक आठवड्याला सरासरी 500 जण भेट देत आहेत.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : सरकारला प्रायश्चित्त करायला लावले जात असेल तर…; वडेट्टीवारांचे सूचक विधान

लवकरच माहिम ते वरळी बोट सेवा 

माहिम सी फूड प्लाझा या ठिकाणी पर्यटक, खवय्ये यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. नजीकच्या काळात याठिकाणी अधिकाधिक सुविधा देतानाच कायमस्वरूपी प्रसाधनगृह आणि पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, लवकरच या ठिकाणी माहिम ते दादर ते वरळी अशी बोट सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे जी/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -