घरCORONA UPDATEMobile App अभावी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम थांबवण्याची आली वेळ!

Mobile App अभावी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम थांबवण्याची आली वेळ!

Subscribe

‘कोविड – १९’ या साथ रोगाला आळा घालण्‍यासाठी राज्‍यभरात राबविण्‍यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबईत तीन दिवसांपासून राबवण्‍यास प्रारंभ झाला आहे. मुंबई महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयात राबवण्यास आलेल्या मोहिमेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोहिमेत विविध आजारांच्या व्यक्तींची माहिती Android App वर संग्रहित करणे आवश्यक आहे. परंतु हे App तयार नसताना ही मोहीम राबवण्याची घाई मुख्यमंत्र्यांच्या शिलेदारांनी सुरू केली. त्यामुळे आता App अभावी ही मोहीम थांबवण्याची वेळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.

काय आहे ही मोहीम?

माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी मुंबईत सुमारे ४० लाख घरांमध्ये केली जाणार आहे. प्रत्‍येक घरापर्यंत संपर्क साधण्‍यासाठी सुमारे ५ हजारांचा चमू बनवण्यात आला आहे. यापैकी प्रत्‍येक चमुमध्‍ये ३ व्‍यक्तींचा समावेश आहे. या चमुद्वारे प्राथमिक पडताळणी दरम्‍यान शारीरिक तापमान, शरीरातील प्राणवायूची पातळी (Oxygen Saturation) आदी बाबी तपासल्‍या जात आहेत. प्रत्‍येक चमुकडे ‘थर्मल गन’ देण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर प्राणवायूची पातळी मोजण्‍यासाठी ‘ऑक्सिमीटर’ही देण्यात आले आहेत. ज्‍येष्‍ठ नागरिक व सहव्‍याधी (Co-morbidity) असणाऱ्या घरातील सदस्‍यांची नोंद घेतली जात आहे.

- Advertisement -

माहिती घेतली, पण पुढे काय?

तीन दिवसांपूर्वी ही मोहीम सुरू होऊन प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये सरकारी आदेशानुसार प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून विविध आजार असलेल्या रुग्णांची माहिती नोंद वहीत टिपून घेतली जात आहे. या मोहिमेदरम्‍यान प्रत्‍येक कुटुंबाशी संपर्क साधताना जी माहिती मिळेल, ती सर्व माहिती राज्‍य सरकारद्वारे या मोहिमेसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या मोबाईल Appमध्‍ये जतन करणे आवश्यक आहे. यामुळे उपलब्‍ध होणाऱ्या सर्व माहितीचे जलद गतीने विश्‍लेषण करणे शक्‍य होणार आहे. मात्र असे असताना मुंबई महापालिकेने १५ सप्टेंबरचा मुहूर्त साधताना मोबाईल App चा विचारच केला नाही. त्यामुळे २४ विभाग कार्यलयांमधील वैदयकीय अधिकाऱ्यांना कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी ही मोहीम एवढ्या लवकर सुरू करण्याची घाई का केली? असा सवाल करत कागदोपत्री नोंद घेतली जाणारी ही नोंद मोबाईल App विकसित होईपर्यंत थांबवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे वैद्यकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, नगरसेवक, तसेच लोकप्रतिनिधी यांनी महापालिकेला ही मोहीम राबवण्यास सहकार्य करावे व त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. त्यानुसार शिवसेना नगरसेवकांनी १५ सप्टेंबरचा मुहूर्त न चुकवता ही मोहीम राबवण्यासाठी हिरीरीने भाग घेतला. परंतु महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही मोहीम राबवण्याचे निर्देश देताना त्यांना मोबाईल Appचा विसर पडला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत प्रारंभीच गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले पहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -