घरक्रीडाIPL 2020 : सलामीच्या लढतीत 'बराबर की टक्कर'!

IPL 2020 : सलामीच्या लढतीत ‘बराबर की टक्कर’!

Subscribe

सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत.  

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आणि आयपीएल ही भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा. त्यामुळे भारतीय चाहते आयपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. एरवी मार्चच्या अखेरीस सुरु होणाऱ्या या स्पर्धेला यंदा कोरोनामुळे १९ सप्टेंबर म्हणजेच शनिवारपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या लढतीत रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आणि महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर संघ आमनेसामने येणार आहे. मागील वर्षी याच दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता, ज्यात मुंबईने अवघ्या एका धावेने विजय मिळवत विक्रमी चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यामुळे यंदाच्या सलामीच्या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

चेन्नईच्या संघात बरेच अनुभवी खेळाडू

मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांना यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक फटका जर कोणत्या संघाला बसला असेल, तर तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. त्यांच्या १३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती, ज्यात दोन खेळाडूंचा समावेश होता. त्यातच त्यांचे दोन प्रमुख खेळाडू फलंदाज सुरेश रैना आणि ऑफस्पिनर हरभजन सिंग यंदा आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्यामुळे यंदा चेन्नईला जेतेपद मिळवण्यास अधिक मेहनत करावी लागू शकेल. मात्र, या संघात बरेच अनुभवी खेळाडू असून ते दबावतही चांगली कामगिरी करण्यात सक्षम आहेत. त्यातच त्यांच्याकडे महेंद्रसिंग धोनीसारखा उत्कृष्ट कर्णधार आहे. धोनीने मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्यामुळे त्याच्यावरील थोडा दबाव कमी झालेला असून तो यंदाच्या स्पर्धेत आक्रमक शैलीत खेळताना दिसू शकेल. त्यामुळे मुंबईच्या संघाला चेन्नईला कमी लेखून चालणार नाही.

- Advertisement -

मुंबईच्या संघात फिरकीपटूंची कमतरता

मुंबईला यंदाही आयपीएल जिंकण्यासाठी दावेदार मानले जात आहे. मात्र, सलामीच्या सामन्यात चेन्नईचा संघ त्यांना नक्कीच झुंज देईल. मुंबईकडे कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह असे अनुभवी खेळाडू असून त्यांना दबाव कसा हाताळायचा हे ठाऊक आहे. चेन्नईच्या संघाची फिरकी ही भक्कम बाजू असून याच बाबतीत मुंबईचा संघ थोडा मागे पडतो. या संघात राहुल चहर आणि कृणाल पांड्यासारखे फिरकीपटू आहेत, पण या दोघांनाही ‘मॅचविनर’ गोलंदाज म्हणता येणार नाही. याचा फायदा चेन्नईला होऊ शकेल. मात्र, चेन्नईला बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या तेज जोडगोळीपासून सावध राहावे लागणार आहे. या दोघांना आपला सर्वोत्तम खेळ करण्यात यश आल्यास मुंबईला रोखणे चेन्नईला अवघड जाईल.


सामन्याचे स्थळ : अबू धाबी, सामन्याची वेळ : रात्री ७.३० पासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -