मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत वाढ

मलेरिया, गॅस्ट्रोचा प्रसार जरी वाढला असला तरी लेप्टो, डेंग्यू, चिकनगुनिया आणि एच १ एन १ हे आजार नियंत्रणात आले आहेत.

World Mosquito Day 2021 malaria Mosquito borne diseases on rise in Mumbai in August

बदलत्या वातावरणामुळे सध्या नागरिकांमध्ये ताप आणि सर्दीची लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यातच कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून मुंबईमध्ये मलेरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याचवेळी लेप्टो,कावीळ आणि चिकुनगुनियाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे.

डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये बरसलेल्या पावसांच्या सरीमुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. १ ते ९ जानेवारीदरम्यान मुंबईमध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक ९६ रुग्ण, तर मलेरियाचे ४३ रुग्ण सापडले आहेत. मलेरिया, गॅस्ट्रोचा प्रसार जरी वाढला असला तरी लेप्टो, डेंग्यू, चिकनगुनिया आणि एच १ एन १ हे आजार नियंत्रणात आले आहेत. लेप्टोचा १ आणि हेपेटायटिसचे ७ रुग्ण मुंबईमध्ये सापडले आहे. शनिवारी मुंबईत अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा पावसाळी आजार वाढतील, अशी भीती पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
२०२१ मध्ये मुंबईमध्ये मलेरियाचे ५,१९३, लेप्टोचे २२४, डेंग्यू ८७६, गॅस्ट्रो ३,११०, हेपेटायटिस ३०८, चिकनगुनिया ८० आणि एच १ एन १ चे ६४ रुग्ण सापडले होते.